खैरे-जंजाळ यांच्यात पुन्हा ठिणगी...

By Admin | Updated: June 9, 2017 01:06 IST2017-06-09T01:05:33+5:302017-06-09T01:06:00+5:30

औरंगाबाद : शिवसेनेच्या ३२ व्या वर्धापनदिनी आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला.

Sparks again between Khaira janzal ... | खैरे-जंजाळ यांच्यात पुन्हा ठिणगी...

खैरे-जंजाळ यांच्यात पुन्हा ठिणगी...

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेच्या ३२ व्या वर्धापनदिनी आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला. खा.चंद्रकांत खैरे आणि माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या समक्ष व्यासपीठावरच शिवीगाळ होऊन शाब्दिक चकमक झाली.
संत एकनाथ रंगमंदिरात पक्षाच्या जिल्ह्यातील व बाहेरगावांहून आलेल्या हजारो पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने हा प्रकार घडला. जंजाळ समर्थकांनी खैरे विरोधी घोषणा देऊन रंगमंदिर सोडले. या मानापमान नाट्यामुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट झाले असून, याचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकरणामागे मोठी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष वर्धापन दिन असताना जंजाळ यांचे कुठल्याही प्रेसनोट आणि जाहिरातींमध्ये नाव नव्हते. त्यांच्याकडे भाविसेचे राज्य निमंत्रक पद असतानाही त्यांना डावलल्याची भावना माजी आ.जैस्वाल यांनी भाषणातून व्यक्त केली. जैस्वाल यांनी व्यासपीठावरून मनोगतामध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर संपर्कप्रमुख घोसाळकर भाषणात म्हणाले, जैस्वाल तुमच्या मनोगताची पक्षाने नोंद घेतली आहे. दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या विरोधात भाषणे सुरू असताना जंजाळ हे बाहेर जाण्यासाठी संपर्कप्रमुख घोसाळकर यांची परवानगी घेण्यासाठी आले. तेथे खा.खैरे यांनी जंजाळ यांचा हात पकडला. यातूनच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. राज्यमंत्री खोतकर यांनीही जंजाळ यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जैस्वाल यांनी जंजाळ यांना व्यासपीठावरून खाली नेले. त्यांची समजूत काढण्यासाठी नरेंद्र त्रिवेदी, विकास जैन यांनी प्रयत्न केला. याप्रकरणी जंजाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वरिष्ठांसमोर हे प्रकरण घडले. त्यामुळे त्यांना माहिती आहे. सुरुवात कुणी केली. खैरेंनी माझा हात धरून अपमानास्पद बोलायचे काहीही कारण नव्हते.
ही घटना घडली त्यावेळी व्यासपीठावर हिंगोलीच्या जि. प. अध्यक्ष शिवराणी नरवडे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, अण्णासाहेब माने, राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, सुहास दाशरथे, रंजना कुलकर्णी, अनिता घोडेले, मोहन मेघावाले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Sparks again between Khaira janzal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.