दीडशे एकरावरील सोयाबीन बियाणे मातीत
By Admin | Updated: July 17, 2014 01:09 IST2014-07-17T00:54:41+5:302014-07-17T01:09:37+5:30
कळंब : अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असतानाच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले होते.

दीडशे एकरावरील सोयाबीन बियाणे मातीत
कळंब : अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असतानाच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले होते. असे असतानाच मागील आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या धिराने पेरणी सुरु केली. मात्र सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येवू लागल्या आहेत. येथील कृषी विभागाकडे दिवसभरात एक-दोन नव्हे, तर २५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या शेतकऱ्यांचे तब्बल दीडशे एकरातील बियाणे मातीत गेले आहे. हा आकडा आणखी वाढणार आहे.
तालुक्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात वर्षागणिक वाढ होवू लागली आहे. एकूण खरीप हंगामातील लागवड क्षेत्राच्या जवळपास ५० टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होत आहे. त्यामुळे आजघडीला सोयाबीन हे प्रमुख पीक बनले आहेत. गतवर्षी ३३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यानुसार चालू हंगामासाठी कृषी विभागाने ४३ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनीही याच पिकावर भर दिल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारींचा ‘फ्लो’ वाढला आहे. कृषी विभागाकडे अधिकृतपणे दिवसभरात २५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तोंडी तक्रारींची संख्या तर शंभराच्या आसपास असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. २५ शेतकऱ्यांचा विचार केला असता, दीडशे एकरवरील बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे गारपिटीच्या तडाख्यातून सावरलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
या शेतकऱ्यांनी नोंदविली तक्रार
पं.स. कृषी विभागामध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सुनील तांबारे (आंधोरा), संजय पवार, मोहन पवार (करंजकल्ला), बिभीषण गायके, अशोक काळे (मंगरुळ), दिगंबर खापे, परमेश्वर शिंदे (भाटशिरपुरा), नानासाहेब शेळके, शंकर शेळके, सुहास शेळके (बोर्डा), विनोद घाडगे (एकुरगा), महादेव मडके (मोहा), शिवमूर्ती खानोळे (शेळका धानोरा), रामहरी गायकवाड (लोहटा पू.), विकास यादव, सुरेश दशवंत (पिंपळगाव डोळा), गोरख करंजकर (खामसवाडी), रामहरी कवडे, हनुमंत शिंदे, विक्रम कवडे, विश्वजीत पाटील (कन्हेरवाडी) यांचा समावेश आहे.
अशीही टोलवाटोलवी
तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दूरध्वनी उचलला नाही. तर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी ऐन हंगामात रजेवर असल्याचे समजते. त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी आर.पी. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, याची जास्त जबाबदारी पंचायत समितीची असून, माहिती घेवू असे बेधडक उत्तर दिले. एकूणच तालुक्यातील कृषी यंत्रणेमध्ये समन्वय राहिलेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न पडला आहे.
नुकसानीचे पंचनामे करा : पाटील
उस्मानाबाद : अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यातून बळीराजा कसाबसा सावरत असतानाच आता सोयाबीन बियाणाची पेरणी करुनही उगवण झालेली नाही. या नैराश्यातूनच शेलगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यामुळे हा प्रश्न गांभिर्याने घेऊन बियाणे न उगवलेल्या शेतीचे पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कृषी आयुक्तांशीही चर्चा केली आहे. दरम्यान, माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांनीही पिकांची पाहणी केली.
अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला पावसाला प्रारंभ झाला. उडीद, मुग या पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने कळंबसह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनीही सोयाबीनवर भर दिला आहे. असे असतानाच सोयाबीन बियाणाची उगवण होत नसल्याच्या तक्रारी कळंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळेच शेलगाव (ज) येथील शेतकरी सर्जेराव शिनगारे यांनी आत्महत्या केली. याचे गांभिर्य ओळखून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाही, अशा क्षेत्राचे तातडीने पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून केली आहे. दरम्यान, पाटील यांनी कृषी आयुक्तांशीही चर्चा केली आहे.