पेरण्या खोळंबल्या; दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: June 24, 2014 00:24 IST2014-06-24T00:24:14+5:302014-06-24T00:24:14+5:30
लोकमत चमू , उस्मानाबाद यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. हा अंदाज खरा ठरविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पेरण्या खोळंबल्या; दुष्काळाचे सावट
लोकमत चमू , उस्मानाबाद
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. हा अंदाज खरा ठरविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. मृग नक्षत्र रविवारी संपले असून, आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला तरीही वरुणराजा काही बरसायला तयार नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील मोठे क्षेत्र पेरण्याअभावी पडून आहे. पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास जिल्ह्याला पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागतो. की काय अशी भीती आता शेतकऱ्यासह सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
उशिराच्या पेरणीमुळे उडीद, मुगाच्या उत्पन्नावर परिणाम
बालाजी आडसूळ ल्ल कळंब
तालुक्यात मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्राचा शिडकावा तर झालाच नाही; शिवाय संपूर्ण मृग नक्षत्रात पेरणीयोग्य दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत. यामुळे चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांच्या उडीद, मुग या सारख्या अल्पजीवी पिकाच्या पेरण्यावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.
कळंब तालुक्यात खरीप हंगामामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने आपले क्षेत्र वहितीखाली आणतात. तालुक्यात जवळपास ७० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाखालील विविध पिके घेण्यात येत असल्याने खरीप हंगाम हा तालुक्यातील प्रमुख पीक हंगाम आहे. यामध्ये प्रामुख्याने साोयाबीन, कापूस यासारख्या नगदी पिकाचे क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास गेल्याने खरीप हंगामाचा शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक हातभार लागत आहे.
खरीप हंगामातील पेरणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या शेताची आंतरमशागतीची कामे जवळपास पूर्णत्वास आली आहेत. उन्हाळ्यातील नांगरणी, कोळपणी आदी कामे करुन शेतकऱ्यांनी आपली शेती पेरणीयोग्य करुन ठेवली आहेत. शेतातील यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आपली मशागतीची कामे पूर्ण करुन घेतली आहेत. रोहिण्या नक्षत्रातील पावसाचाही शिडकावा झालेला नाही. याशिवाय मृग नक्षत्रातील दमदार व पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मोठी निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या भाषेत अजून आगुट मोहरली नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापपावेतो आपल्या चाढ्यावर मूठ ठेवण्याची वेळ आलेली नाही.
लांबलेल्या पेरण्या नुकसानकारक
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत. याचा फटका पेरणीक्षेत्रास तसेच उत्पादनावरही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उशिरा झालेल्या पेरण्या कापूस, सोयाबीन, तूर या पिकास हानीकारक नसल्या तरी उडीद, मूग, तीळ, धने यासारख्या अल्पजीवी पिकावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या ठरतात. याशिवाय जमिनीचा ताव ढगाळ हवामानामुळे व हवेतील आद्रतेमुळे निघून जात असल्याने पिकाच्या उगवण क्षमतेवर व वाढीवरही प्रतिकूल परिणाम करु शकतात. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, पावसाची प्रतीक्षा करत बसला आहे.
७२ हजार हेक्टरवर पेरण्या नाहीत
मारुती कदम ल्ल उमरगा
मागील २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ तालुक्यात अद्याप खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ झाला नसल्याने दुष्काळाचे सावट घोंघावत आहे.
तालुक्यात खरीपाचे एकूण ७२ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. खरीपाच्या एकूण सरासरी क्षेत्रात तूर, उडीद, मुग, सोयाबीन, सूर्यफुल, बाजरी या विविध खरीप पिकांची पेरणी केली जाते. गतवर्षी तालुक्यात मृग नक्षत्रात झालेल्या पेरणी योग्य पावसामुळे सोयाबीनच्या एकूण ६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापेक्षा १५ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तालुक्यात पावसाची एकूण सरासरी ९५० मि.मी. आहे. गतवर्षी सरासरीपैकी ८५० मि.मी. पाऊस झाला होता. वेळेवर झालेल्या पावसाने गतवर्षी उडीद, मुग या पिकांची जून अखेर मोठी वाढ झाली होती. यावर्षी मृग संपून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असला तरी अद्याप पेरणीलायक एखादाही पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातचा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाने ओढ दिल्याने या वर्षातील शेती व्यवसायाची सर्व समीकरणे कोलमडली आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून चालू असलेल्या उष्णतेची दाहकता अजूनही कायम आहे. पाऊस झाला नसल्याने जमिनीला पडलेल्या भेगा कायम आहेत. कुंभारी वारा आणि उष्णतेची दाहकता यामुळे दुष्काळाचे सावट घोंघावत आहे.
शेतकरी कर्जबाजारी
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कचाट्यात सापडला आहे. खते, बी-बियाणे खरेदीसाठी कर्जाऊ रकमा काढलेल्या शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.
चारा पाण्याचा प्रश्न गंभिर
नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, वादळी वाऱ्याने चारा इतरत्र उडून गेल्याने शेतकऱ्यांना पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दोन वर्षाच्या कालावधीत जेमतेम पाऊस झाल्याने विंधन विहिरी, विहिरी, साठवण तलाव, पाझर तलाव, पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली असून, तालुक्यातील ९० टक्के तलाव कोरडेठाक पडले आहेत. विहिरीची व बोअरची पाणी पातळी कमालीची खोल गेल्याने शिवारातील वानर, कोल्हे, मोर, वराह, ससे आदीसह वन्य प्राण्याबरोबरच पशुधनांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
खते, बी-बियाणे धूळ खात
पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यातील ७० कृषी सेवा चालकांनी खरीपाच्या पेरणीसाठी लाखो रुपयाच्या कर्जाऊ रक्कमा काढून विक्रीसाठी खते, बी-बियाणांची खरेदी केली. मृग नक्षत्रात एखादाही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली खते, बी-बियाणे विक्रीअभावी धूळखात पडून आहेत.
शेतमजुरांची उपासमार
शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना शेतीची कामे उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील खरीपाचे ७२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडीक पडून असल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे.
बाजारपेठ ओस
एरवी किरणा, भूसार, कापड, शालेय साहित्य खरेदीसाठी गजबजलेल्या बाजार पेठांवर पावसाचा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांकडे आर्थिक आवक नसल्याने व शेतकऱ्यांची बाजारातील पत संपुष्टात आल्याने बाजारपेठा ओस पडल्याचे दिसून येत आहे.