नोटिसा मिळताच वाढली प्राध्यापकांची वर्दळ
By Admin | Updated: December 24, 2014 01:04 IST2014-12-24T00:34:40+5:302014-12-24T01:04:10+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कामचुकार प्राध्यापकांना नोटिसा बजाविताच त्यांना धडकी भरली

नोटिसा मिळताच वाढली प्राध्यापकांची वर्दळ
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कामचुकार प्राध्यापकांना नोटिसा बजाविताच त्यांना धडकी भरली असून, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्रांवर त्यांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसत आहे.
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये विद्यापीठासह पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीची ९ व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे १, अशी १० केंद्रे कार्यान्वित आहेत. यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विद्यापीठातच एकमेव केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सध्या अनेक केंद्रांवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता तेथे गेलेल्या संबंधित प्राध्यापकांना रुजू करून घेण्यात आले नाही, तर काही ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीचे काम शिल्लक असल्यामुळे काहींना रुजू करून घेण्यात आले आहे.
आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षेतील उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी विद्यापीठासह चार जिल्ह्यांत १० केंद्रे (डीकॅस) स्थापन केली आहेत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्या त्या जिल्ह्यांतील पात्र प्राध्यापकांना लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानादेखील अनेक महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ही बाब परीक्षा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड तसेच कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी संबंधित महाविद्यालयांना स्मरणपत्रे पाठवून, दूरध्वनीवरून प्राचार्यांना संपर्क साधून प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्याची विनंती केली. तरीदेखील जवळपास ८०० प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यापीठाने अशा प्राध्यापकांना शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, या आशयाच्या कारणेदर्शक नोटिसा बजाविल्या आहेत.
येत्या ८-१० दिवसांत विद्यापीठामध्ये परीक्षा मंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून, या बैठकीसमोर संबंधित प्राध्यापकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.