सोनारीतील नुकसानीचे पंचनामे सुरू
By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:28:46+5:302014-06-08T00:55:46+5:30
परंडा : तालुक्यातील बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे.

सोनारीतील नुकसानीचे पंचनामे सुरू
परंडा : तालुक्यातील बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी राऊत यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
४ जून रोजी दुपारी सुमारास सोनारी परिसरात जोरदार वादळासह पाऊस झाला. यात श्री काळ भैरवनाथ मंदिर प्रवेशद्वाराजवळील व्यापाऱ्यांच्या दुकानावर लिंबाची झाडे उन्मळून पडल्याने दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय १६ ते १७ जणाच्या घरावरील पत्रे उडून जाऊन संसार उघड्यावर पडले. या वादळी पावसात परिसरातील जवळजवळ ६० ते ७० हेक्टरवरील ऊस, फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने सोनारीचे माजी सरपंच नवनाथ जगताप यांनी उपविभागीय अधिकारी राऊत यांची भेट घेऊन नुकसानीची माहिती दिली होती. यानंतर ५ जून रोजी उपविभागीय अधिकारी यांनी सोनारीस भेट देवून नुकसानीची पाहणी केली. तसेच प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान, वादळी पावसात नुकसानीबरोबरच अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीने हे खांब त्वरित उभारून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी माजी सरपंच जगताप यांनी केली आहे. (वार्ताहर)