आईला घेण्यासाठी गेला अन् मृतदेहच घाटीत न्यावा लागला
By राम शिनगारे | Updated: October 15, 2023 20:33 IST2023-10-15T20:33:08+5:302023-10-15T20:33:26+5:30
क्रेबिंज चौकातील घटना : सिमेंटच्या टँकरने वृद्ध महिलेला चिरडले

आईला घेण्यासाठी गेला अन् मृतदेहच घाटीत न्यावा लागला
छत्रपती संभाजीनगर : शेतीतील कामांसाठी गावाकडे गेलेली आई परतल्यानंतर केंब्रिज चौकात उतरली. तिने फोन करून मुलास घरी घेऊन जाण्यासाठी बोलावले. मुलगा दुचाकीवर केंब्रिज चौकात येईपर्यंत एका सिंमेटच्या टँकरने चिरडले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. मुलगा घटनास्थळी आल्यानंतर त्याने तात्काह घाटीत दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. ही घटना रविवारी (दि.१५) दुपारी २.३० वाजता केब्रिंज चौकात घडली.
पुष्पाबाई वामनराव जगताप (मुळ गाव भेंडी सुत्रक, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला, ह.मु. पर्ल्स हौसिंग सोसायटी, इस्कॉन मंदिरासमोर, जालना रोड) असे टँकरने चिरडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पाबाई यांचा एकुलता एक मुलगा व्यावसायिक आहे. तो केंब्रिज परिसरातील एका साेसायटीत राहतो. त्यासुद्धा मुलासोबत शहरातच राहतात. काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात शेती असल्यामुळे शेतीमधील कामांसाठी गावाकडे गेल्या होत्या. शेतीचे कामे आटोपून बसने त्या रविवारी दुपारी केंब्रिज चौकात उतरल्या. तेथून मुलाला फोन करून घेण्यास बोलावले.
मुलाने घेण्यास येतो म्हणून आईचा फोन ठेवला. पुष्पाबाई कलश हाॅटेलसमोर उभ्या असताना सिमेंट टँकर (केए २८ एए ३९२७) चालकाने रिव्हर्स टँकर घेतला. तेव्हा पुष्पाबाईंना टँकरने पाठीमागुन ३० फुट फरफटत नेत चिरडले. या अपघातामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. तेव्हा पुष्पाबाईंचा मुलगा घटनास्थळी पोहचला. जमलेली गर्दी पाहुन त्यांनी कोण जखमी झाले हे पाहण्यासाठी आत शिरले. तेव्हा त्यांना स्वत:चीच आई गंभीर जखमी अवस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
एमआयडीसी सिडकोत गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलगा योगेश जगताप यांच्या तक्रारीवरून चालक निंगराज बिस्गोंड (रा. बिजापूर, कर्नाटक) याच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.