छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांत शहरात जे दरोडे पडले, चोऱ्या होत आहेत, त्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून, याविषयी पोलिस आयुक्तांना तथ्य शोधण्यास सांगितले आहे, असे खळबळजनक वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
गेल्या काही दिवसांत शहरातील गजबजलेल्या वसाहतींमध्ये दरोडे पडत आहेत. यामुळे शहरातील रहिवाशांमध्ये दहशत आहे. याकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शहरात जे दरोडे पडले आहेत, त्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. कारण, जे काही दरोडेखोर, चोर आहेत, ते असे कृत्य करण्यासाठी एकदम तयार होत नाहीत. त्यांच्यामागे एक साखळी असते. ही साखळी शोधून काढण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
उद्धवसेनेच्यावतीने लावलेल्या बॅनरविषयी विचारले असता पालकमंत्री म्हणाले, बॅनर लावून पक्ष बळकट होत नसतो. त्यांनी गळती थांबवावी. एकटे जावे लागेल म्हणून ते बॅनरबाजी करत आहेत. बैठक घ्यायला हवी, पण, ‘एमआयएम’ला सोबत घ्यायला हवे का, याविषयी कार्यकर्त्यांनाही विचारा आणि अंतर्गत गटबाजीही बघा, असा खोचक सल्लाही त्यांनी उद्धवसेनेला दिला.
महिला आयोगाच्या अध्यक्षांवर विरोधक टीका करीत आहे, याविषयी विचारले असता महिला आयोगबाबत मी जास्त बोलणार नाही. त्यांच्याविषयी निर्णय मुख्यमंत्री घेतील, महिला आयोगाने सक्षम काम केले पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ तर द्या. त्यांचे स्वागत करू. पण, त्यांच्यातील विस्तव असणारे बाकीचे लोक आहेत, त्यामुळे त्यांचे एकत्र येणे, या फक्त चर्चा आहेत, असे आम्हाला वाटते.
आपल्या ‘पीए’ला सांगलीहून फोन...कामगारच्या संसार उपयोगी वस्तूत राज्यभरात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. माझा ‘पीए’ छत्रपती संभाजीनगरात राहतो. त्याला भांडे घेण्यासाठी सांगलीतून फोन आला, यामुळे हा राज्यव्यापी घोटाळा आहे. मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याची चाैकशी करावी, अशी आपली मागणी असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हणाले.
अद्याप असे निष्पन्न झालेले नाहीसातारा पोलिस ठाण्यातील एका अपहरण प्रकरणात शिरसाठ नावाच्या अनुपस्थित पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग दिसताच सेवेतून त्याला १५ दिवसांत सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बाकी, अन्य कोणत्याही गुन्ह्यांत अद्याप तरी पोलिसांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग किंवा नाव असल्याचा पुरावेदेखील नाहीत किंवा तसे निष्पन्नही झालेले नाही. बहुतांश घरफोडी, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत; पण अशा कुठल्याही गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग नाही. तसे आढळून आल्यास आमची "नो टॉलस्न्स" भूमिका आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही.- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त