शेकटा ( छत्रपती संभाजीनगर) : साखरपुड्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे चाललेले लष्करी जवान कैलास वसंत डोके (२७) हे हसनाबादवाडी -शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे अपघात होऊन ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली आहे.
रोहान (ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) येथील रहिवासी जवान कैलास डोके यांचा साखरपुडा मंगळवारी (दि. ७) धानोरा (ता.फुलंब्री) येथे होता. त्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी कैलास डोके हे बुलेटवरून (एम.एच.२१ बी एक्स ७४३२) देऊळगावराजा येथून छत्रपती संभाजीनगरला जात असताना हसनाबादवाडीजवळ त्यांचा अपघात होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी डोके यांना तपासून मृत घोषित केले.
अपघात होऊन आठ तास झाल्यावरसुद्धा करमाड पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळू शकली नाही. जालना मार्गावर नादुरुस्त उभ्या कारला पाठीमागून जवान डोके यांची बुलेट धडकली व त्यांना पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात कैलास डोके हे गंभीर जखमी झाले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमका अपघात कसा झाला व अपघातात किती लोक जखमी झाले याचा उलगडा रात्री दहा वाजेपर्यंत झाला नव्हता.