सिडको वाळूज महानगरात ड्रेनेजलाईनचे भिजत घोंगडे कायम

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:14+5:302020-12-04T04:12:14+5:30

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील ड्रेनेजलाईनचे भिजत घोंगडे कायम असून प्रशासनाने अंतर्गत ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण केले आहे. मात्र, ...

Soaked blankets of drainage line maintained in CIDCO Waluj metropolis | सिडको वाळूज महानगरात ड्रेनेजलाईनचे भिजत घोंगडे कायम

सिडको वाळूज महानगरात ड्रेनेजलाईनचे भिजत घोंगडे कायम

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील ड्रेनेजलाईनचे भिजत घोंगडे कायम असून प्रशासनाने अंतर्गत ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण केले आहे. मात्र, एसटीपी प्रकल्प रखडल्यामुळे ड्रेनेजलाईनसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. सिडको महानगरातील ड्रेनेजलाईनचा प्रश्न २० वर्षांपासून गाजत आहे.

सिडकोकडून भूखंड घेऊन मध्यम व उच्चवर्गीयांनी प्रशस्त घरे व बंगले बांधली आहेत. मात्र, सिडकोने ड्रेनेजलाईन न टाकल्याने अनेकांनी सेफ्टिक टँक उभारले आहेत. सेफ्टिक टँक चोकअप होऊन दुर्गंधी पसरत असल्याने वाद होतात. ड्रेनेजलाईनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे प्रशासनाच्या वतीने ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले. आजघडीला वाळूज महानगर १ व २ व ४ मधील ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, एसटीपी प्रकल्प न उभारल्यामुळे अद्यापपर्यंत ड्रेनेजलाईनची जोडणी देण्यात आली नाही.

सिडकोचा एसटीपी प्रकल्प रखडला

सिडको प्रशासनाच्या वतीने कोट्यवधींचा निधी खर्च करून या परिसरात ड्रेनेजलाईनचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण केले आहे. वडगाव शिवारात ५ कोटी ३४ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या पंपिंग स्टेशनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ड्रेनेज पाण्यावर प्रकिया करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एसटीपी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रकिया राबवून एसटीपी प्रकल्प उभारला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता दीपक हिवाळे यांनी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया....

सेफ्टिक टँक स्वच्छतेसाठी आर्थिक भुर्दंड

ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी अद्यापपर्यंत जोडणी न दिल्यामुळे या परिसरातील नागरिकांना सेफ्टिक टँकमध्ये सांडपाणी साठावे लागत आहे. सेफ्टिक टँक भरल्यानंतर सांडपाणी उघड्यावर पसरत असल्यामुळे नागरिकांना वॅक्यूम क्लिनर मशीनद्वारे आर्थिक भुर्दंड सहन करून सेफ्टिक टँकची स्वच्छता करावी लागते.

- सुदाम जाधव (त्रस्त नागरिक)

सिडकोचा गलथान कारभार

सिडको प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. ड्रेनेजलाईनचा प्रश्न सुटलेला नसून सेवाकराची प्रशासनाकडून सक्तीने वसुली केली जाते. मात्र, सुविधा पुरविताना हात आखडता घेतला जात असल्यामुळे सतत संघर्ष करावा लागतो.

- पंडित शिंदे (त्रस्त नागरिक)

फोटो ओळ- सिडको प्रशासनाच्या वतीने ड्रेनेजलाईनसाठी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

फोटो क्रमांक-पंपिंग स्टेशन

Web Title: Soaked blankets of drainage line maintained in CIDCO Waluj metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.