...तर पाणीपुरवठा योजनांना मिळेल गती

By Admin | Updated: August 7, 2014 01:27 IST2014-08-07T00:35:53+5:302014-08-07T01:27:30+5:30

परभणी: ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनांना गती मिळेल,

So the water supply schemes will get the speed | ...तर पाणीपुरवठा योजनांना मिळेल गती

...तर पाणीपुरवठा योजनांना मिळेल गती

परभणी: शासनाने पाणीपुरवठा योजनांच्या धोरणांमध्ये आवश्यक त्या सुधारणा व शिथिलता केल्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त करीत जिल्ह्यात जास्तीत जास्त योजना कार्यान्वित व्हाव्यात, अशी अपेक्षा जि. प. चे कृषी सभापती गणेशराव रोकडे यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जि. प. कन्या शाळेच्या सभागृहात ६ आॅगस्ट रोजी एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात रोकडे बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडूंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोकडे म्हणाले, ग्रामीण पाणीपुरवठा योजनासंदर्भात केलेले बदल स्वागतार्ह आहेत. यापूर्वी गावातून लोकवर्गणी जमा करुन योजना कार्यान्वित करणे गाव प्रमुखांना जड जात होते. काही जाचक अटीमुळे योजना रखडल्या होत्या. मात्र आता शासन निर्णयात पूरक बदल केल्याने योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गती येणार आहे व भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. रखडलेल्या व नवीन योजनांना गती देण्यासाठी संबंधित विभागातील योजनेतील गावांना तत्काळ निधी वितरित करावा, ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अनेक गावात दहा ते वीस लाख रुपयापर्यंत खर्च होऊनही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.
कार्यकारी अभियंता गंगाधर निवडूंगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेस पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी वित्त व संपादणूक अधिकारी प्रताप जावळे, मनुष्य विकास सल्लागार अनिल मुळे, माहिती, शिक्षण संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, पाणी गुणवत्तातज्ज्ञ मुशीर हाश्मी, शाखा अभियंता धाबे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी लेखाधिकारी अनिरुद्ध कावीकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचाही दरडोई खर्च, हगणदारी निर्मूलन अट शिथिलता, तांत्रिक, प्रशासकीय मान्यता व अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले.

Web Title: So the water supply schemes will get the speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.