...तर व्यापारी सोमवारपासून दुकाने उघडतील;मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 12:01 IST2021-04-09T12:00:12+5:302021-04-09T12:01:36+5:30
corona virus in Aurangabad कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, व्यापाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील व्यापाऱ्यांना आश्वासन दिले आहे.

...तर व्यापारी सोमवारपासून दुकाने उघडतील;मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
औरंगाबाद : लॉकडाऊन रद्द करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला दिलेली दोन दिवसांची मुदत गुरुवारी संपली. आज, शुक्रवारी मुख्यमंत्री काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, निर्णय व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक असो वा नकारात्मक; महाराष्ट्र चेंबरची बैठक होईल व येत्या सोमवार (दि. १२) पासून शहरातीलच नव्हे तर राज्यातील सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे गुरुवारी झालेल्या बैठकीत ठरले, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, व्यापाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील व्यापाऱ्यांना आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र चेंबरची ऑनलाईन बैठक झाली. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी हजर होते. काळे यांनी पुढे सांगितले की, ८ ते १० टक्के संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारपासून दुकाने उघडण्यात यावीत, या मागणीवर जोर दिला होता. पण नंतर असे ठरले की, मुख्यमंत्र्यांनी निर्बंध शिथिल करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री आज, शुक्रवारी निर्णय जाहीर करतील. मुख्यमंत्र्यांचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बाजूने असो वा नसो; मात्र, वीकएंड लॉकडाऊननंतर सोमवारपासून दुकाने उघडण्यास सर्वानी होकार व्यक्त केला; पण त्या आधी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर महाराष्ट्र चेंबरची पुन्हा ऑनलाईन बैठक होईल व त्यात पुढील निर्णय घेतला जाईल, असे ठरविण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.