मोफत उपचारासाठी आवश्यक, आतापर्यंत १४ पैकी ८ लाख नागरिकांना गोल्डन कार्ड

By विजय सरवदे | Published: March 12, 2024 12:51 PM2024-03-12T12:51:30+5:302024-03-12T12:52:34+5:30

कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो

So far, 8 lakh citizens out of 14 lakh have received golden cards required for free treatment, | मोफत उपचारासाठी आवश्यक, आतापर्यंत १४ पैकी ८ लाख नागरिकांना गोल्डन कार्ड

मोफत उपचारासाठी आवश्यक, आतापर्यंत १४ पैकी ८ लाख नागरिकांना गोल्डन कार्ड

छत्रपती संभाजीनगर : आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड, गोल्डन कार्ड अनिवार्य असून, हे कार्ड काढण्यासाठी कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड आवश्यक आहे. वरच्या उत्पन्न गटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड काढून ते आधार कार्ड आणि मोबाइलसोबत लिंक करावे लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु ज्यांचे रेशन कार्ड हे आधार कार्ड व मोबाइलसोबत लिंक नाही, त्यांचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी अडचणी येत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वस्त धान्य दुकानदार, तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचना दिल्या आहेत. शासनाने पूर्वी जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार कार्डधारकांचे या कार्डाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर १० लाखांचे उद्दिष्ट झाले. आता नगरपालिका, महापालिका कार्यक्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील १४ लाख ४९ हजार ६६८ नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ६२ हजार ३९१ नागरिकांपैकी काही जण मयत आहेत, तर बहुतेक जण स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे सध्या १२ लाख ८५ हजार ५०९ नागरिकांपैकी ८ लाख ६० हजार ७१७ नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले आहे. ही मोहीम निरंतरपणे चालूच राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचार
ज्या कुटुंबाकडे पिवळे, केशरी किंवा पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड आहे व ते आधार कार्ड आणि मोबाइलसोबत लिंक असेल, तर त्यांना आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड मिळू शकते. अशा कार्डधारकाने पहिल्यांदा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचा रुग्णालयात मोफत उपचार घेता येईल. त्यानंतरही अधिक उपचाराची गरज असेल, तर त्यांना महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पुन्हा ५ लाखांपर्यंत असे एकूण १० लाखांचा मोफत उपचार घेता येतो.

कार्ड नसेल तर...
जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे स्वत: ऑनलाइन अथवा आपले सरकार सेवा केंद्रातून हे कार्ड काढता येते. मात्र, त्यांना केवळ महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

Web Title: So far, 8 lakh citizens out of 14 lakh have received golden cards required for free treatment,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.