नाग, पाल, विंचू यंदा सात दिवस एकत्र
By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-27T23:59:27+5:302014-07-28T00:57:26+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा नागपंचमीदिवशी साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
नाग, पाल, विंचू यंदा सात दिवस एकत्र
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा नागपंचमीदिवशी साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साप, पाल, विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिर परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता आगमन झाले. हे प्राणी एकत्रीत सात दिवस राहणार आहेत. यात्रेत खरगा, गण, भाकणूक, पालखी मिरवणूक हे कार्यक्रम होणार आहेत.
आषाढ अमावस्येदिवशी एकमेकांचे शत्रू समजले जाणारे साप-पाल-विंचू या प्राण्यांचे आगमनापूर्वी पुजारी कल्याण स्वामी यांना मानकरी हरी डोके या मानकऱ्यांच्या घरी आंघोळ घालून मंदिरात नेण्यात आले. तेथे पुजाऱ्याच्या हाताला विधीवत कंकण (काकनऊ) बांधण्यात आले. अमावस्येपासून यात्रेच्या औपचारिकतेस प्रारंभ होतो. बुधवारी पहाटे ४ वाजता पुजाऱ्याचे केस कापले जातात. हा विधी मंदिरासमोर असणाऱ्या दगडी शिळेवर पार पडतो. त्यास खरगा असे म्हणतात. १ आॅगस्ट रोजी नागपंचमीदिवशी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता पुजारी कल्याण स्वामी व पालखी मिरवणूक वाजत गाजत गावातून काढण्यात येणार आहे, त्यास गण असे म्हणतात. सायंकाळी ६ वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओळखले जाते. मंदिराशेजारी ओट्यावर भाकवणूक कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे, रामेश्वर तोडकरी, सरपंच प्रभावती मारडकर, उपसरपंच आनंद बोबडे, राजकुमार पाटील आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. तसेच तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली आहे.
अतिक्रमण हटविले
यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य चौकात तसेच रस्त्यालगत झालेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे यात्रेत या चौकात वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घेतल्याचे उपसरपंच आनंद बोबडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
सावरगावात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली
शनिवारी मंदिरासमोर आगमन झालेल्या साप-पाल-विंचवाचा मुक्काम यंदा दोन दिवसांनी वाढला आहे. हे एकमेकांचे हाडवैरी असणारे प्राणी सात दिवस एकत्रीत राहणार आहेत. या दुर्मिळ दश्याच्या दर्शनासाठी भाविक सावरगावला येत आहेत. तर यात्रेत सुरक्षितता रहावी, यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे सपोनि राहुल देशपांडे यांनी सांगितले. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
माळा बनविण्याचे काम सुरु
लिंबाऱ्याच्या पालापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरी विश्वनाथ डोके यांच्या घरी शनिवारपासून चालू झाले आहे. ते मागील ५० वर्षापासून माळा तयार करण्याचे काम करतात. अख्खे कुटुंब सलग पाच ते सात दिवस निष्काम सेवा करतात. त्यात कसलाही मोबदला घेत नाहीत. या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविक गळ्यात घालतात. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.