उस्मानाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: January 22, 2015 00:43 IST2015-01-22T00:39:38+5:302015-01-22T00:43:22+5:30

उस्मानाबाद : शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मंगळवारी रात्रीही चोरट्यांनी शहरातील सांजा रोडवरील एक दुकान फोडून

Smash of thieves in Usmanabad | उस्मानाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ

उस्मानाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ



उस्मानाबाद : शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मंगळवारी रात्रीही चोरट्यांनी शहरातील सांजा रोडवरील एक दुकान फोडून तीन लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. यापाठोपाठ बुधवारी दुपारी शहरातील तांबरी विभागात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. यामुळे शहरवासियांची झोप उडाली आहे.
शहरातील सांजा रोडवर असलेले शिवपुष्प ट्रेडर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुना उपळा रोड भागात राहणारे सुहास शिवलिंग मडगे यांचे सांजा रोड भागात शिवपुष्प ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते बुधवारी सकाळी ११ या दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश करून चोरी केली. या घटनेत दुकानातील स्टार्टर, पंप तसेच पानबुडी मोटार, केबल आदी साहित्य असा एकूण ३ लाख १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद सुहास मडगे यांनी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
उस्मानाबाद : संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपून परत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात तरूणांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील तांबरी विभागात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील कोंड येथील रहिवाशी असलेल्या स्वाती प्रशांत हैदराबादी या बुधवारी दुपारी तांबरी विभागात त्यांच्या नातेवाईकांकडे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपून त्या परत येत असताना या भागातील संत नरहरी सोनार मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या वीस ते पंचेवीस वर्ष वयोगटातील दोघा तरूणांनी हैदराबादी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून तेथून पळ काढला. याप्रकरणी स्वाती हैदराबादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ८० हजार रूपये किंमतीच्या गंठणाची चोरी झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि शहाणे करीत आहेत.

Web Title: Smash of thieves in Usmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.