‘स्मार्ट’ चा प्रस्ताव अखेर केंद्राकडे
By Admin | Updated: December 17, 2015 00:10 IST2015-12-16T23:54:41+5:302015-12-17T00:10:14+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी मनपाने दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला.

‘स्मार्ट’ चा प्रस्ताव अखेर केंद्राकडे
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी मनपाने दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला. शासनाने औरंगाबादचा प्रस्ताव बुधवारी केंद्र शासनाकडे सादर केला. औरंगाबादची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली किंवा नाही, आता जानेवारीत कळणार आहे. केंद्र शासन पहिल्या वर्षी निवडण्यात आलेल्या २० शहरांची घोषणा करणार आहे.
स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने चिकलठाण्यातील जागेची निवड केली आहे. प्रशासनाने राज्य सरकारकडे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला. चिकलठाण्यालगत हर्सूल सावंगी बायपास परिसरात किमान २५० एकर जागेत अत्याधुनिक टाऊनशिप उभी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावात नमूद आहे.
राज्य सरकारकडे हा प्रकल्प अहवाल सादर करण्याची वाढीव मुदत शनिवारी संपली. तत्पूर्वी मनपाने स्मार्ट सिटीच्या विकासासाठी ग्रीनफिल्डचे मॉडेल निवडले. त्यानुसार पीएमसीने नक्षत्रवाडी आणि चिकलठाणा या दोन भागांचे प्रस्ताव तयार केले होते. ग्रीनफिल्ड प्रकारात किमान २५० एकर मोकळ्या जागेत नवीन टाऊनशिप विकसित करणे अपेक्षित आहे. मनपाला नियोजित मुदतीत एका जागेचा प्रस्ताव निवडून तो राज्य सरकारकडे सादर करावयाचा होता. मात्र, दोन्हीपैकी कोणत्या जागेची निवड करायची हे निश्चित होत नव्हते. पालिका प्रशासनाकडून नक्षत्रवाडीच्या जागेला पसंती देण्यात येत होती. तेथे शासकीय मालकीची जमीन असल्यामुळे ती मिळण्यास अडचण येणार नाही, असे प्रशासनाचे मत होते. काही राजकीय मंडळी चिकलठाण्याची निवड व्हावी यासाठी आग्रही होते. त्यामुळे जागेची निवड लांबली होती. शनिवारी सायंकाळी चिकलठाण्याच्या जागेचा पर्याय निश्चित करण्यात आला.