जिल्ह्यातील लघु-मध्यम उद्योग अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:12+5:302021-05-28T04:05:12+5:30
औरंगाबाद : ‘ब्रेक द चैन’मुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे प्रामुख्याने ऑटोमोबाइल्स उद्योगांनी उत्पादन क्षमता कमी केल्यामुळे या उद्योगांवर आधारित ...

जिल्ह्यातील लघु-मध्यम उद्योग अडचणीत
औरंगाबाद : ‘ब्रेक द चैन’मुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे प्रामुख्याने ऑटोमोबाइल्स उद्योगांनी उत्पादन क्षमता कमी केल्यामुळे या उद्योगांवर आधारित जिल्ह्यातील जवळपास अडीच ते तीन हजार लघु व मध्यम उद्योग अडचणीत आले असल्याचा दावा ‘मासिआ’ संघटनेचे अभय हंचनाळ यांनी केला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. दुसरीकडे, कच्चा माल व वाहतुकीमुळे बजाज ऑटोसारख्या अनेक कंपन्यांचे एक्सपोर्टही ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे. प्रामुख्याने बजाज ऑटोने मागील दोन आठवड्यांपासून आठवड्यातील अवघे पाच दिवसच कंपनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी या कंपनीला आठवड्याची सुटी असून शनिवारी शटडाऊन घेतले आहे. त्यामुळे या कंपनीवर अवलंबून व्हेंडर्सलाही काही दिवस थांबण्यास सांगितले आहे.
बजाज ऑटोमध्ये अलीकडे रिक्षा निर्मिती थांबविली आहे. सध्या येथे फक्त मोटारसायकलचे इंजिन तयार करून ते निर्यात केले जाते. निर्यात क्षमताही मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे कंपनीने १५, २२ मे रोजी शटडाऊन घेतले. २९ मे रोजीही ते घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे, असे या कंपनीच्या अंतर्गत युनियनचे अध्यक्ष विजय पवार यांनी सांगितले.
दुसरीकडे, अभय हंचनाळ यांनी सांगितले की, बजाज ऑटोप्रमाणे ऑटोमोबाइलशी निगडित मोठ्या उद्योगांनीही उत्पादन क्षमता कमी केली असल्यामुळे जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार लघु- मध्यम उद्योगांना ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यापैकी बहुतांशी उद्योग आठवड्यातील ४-५ दिवसच चालतात.
चौकट.....
आणखी महिनाभर अशीच स्थिती राहील
लॉकडाऊनसंदर्भात अद्याप शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. बहुतेक जवळच्या राज्यांमधील कोरोनाची स्थिती सुधारत असल्यामुळे १ जूनपासून तेथील बाजारपेठा हळूहळू उघडतील. आपल्या राज्यातही निर्बंध कमी होतील. १ तारखेपासून बाजारपेठा सुरू झाल्या तरी पुढे १०-१५ दिवसांनंतर उलाढालीला सुरुवात होईल. त्यामुळे उद्योगांना लगेच चांगले दिवस येतील, असे नाही. पुढील महिनाभर तरी आजच्या सारखीच परिस्थिती राहील, असे ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले.