प्रमाणपत्र वाटपाची ‘गती मंद’
By Admin | Updated: December 15, 2014 00:50 IST2014-12-15T00:41:11+5:302014-12-15T00:50:07+5:30
बापू सोळुंके, औरंगाबाद औरंगाबाद : राज्य सरकारने गतवर्षीपासून अपंगांना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

प्रमाणपत्र वाटपाची ‘गती मंद’
बापू सोळुंके, औरंगाबाद
औरंगाबाद : राज्य सरकारने गतवर्षीपासून अपंगांना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याकरिता घाटीत प्रमाणपत्र देणारे चार विभाग आणि नोंदणीसाठी केवळ दोन संगणक उपलब्ध करण्यात आले आहेत.
प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असून, त्या प्रमाणात नोंदणी होत नसल्याने दिवसेंदिवस प्रतीक्षा यादी वाढतच असल्याचे समोर आले आहे. आज अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्यांना घाटी प्रशासनाकडून दोन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय भावनेतून विविध योजना आणलेल्या आहेत.
या शिवाय त्यांना बस, रेल्वे प्रवासातही सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे काही डॉक्टरांना हाताशी धरून बोगस अपंग प्रमाणपत्र काढून देणारे रॅकेट अनेक ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त केले.
घाटी रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातूनही अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र काढण्यात आल्याचे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. यावर उपाय म्हणून शासनाने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून देण्यात येणारे अपंग प्रमाणपत्र आॅनलाईन केले आहे. एवढेच नव्हे, तर यापूर्वी देण्यात आलेल्या अपंग प्रमाणपत्राचीही आॅनलाईन नोंदणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच अपंग प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गतवर्षीपासून नव्याने अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी दाखल होणाऱ्यासोबतच याआधी अपंग प्रमाणपत्र घेतलेली मंडळीही आॅनलाईन नोंदणीकरिता घाटीत येत आहेत.
विभाग चार, संगणक दोन
अस्थिव्यंग, अंध व्यक्ती, मनोविकार असलेले आणि मूकबधिरांना वेगवेगळ्या विभागाकडून प्रमाणपत्र देण्यात येतात. अपंग प्रमाणपत्रासाठी आलेल्या व्यक्तीची संबंधित विभागातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर त्याच्यातील अपंगत्वाची नोंदणी संगणकात केली जाते. नोंदणीसाठी प्रत्येक विभागाचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. आॅर्थोपेडिक विभागाकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने त्यांना आठवड्यातून दोन दिवस नोंदणीसाठी देण्यात आले आहेत, तसेच अशीच गर्दी मनोविकृतीशास्त्र विभाग, कान, नाक, घसा विभागातही असते. मनोविकृतीशास्त्र विभागात प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने आॅनलाईन प्रमाणपत्राची नोंदणी करण्याचा त्यांचा दिवस असूनही नोंदणी झाली नाही. परिणामी रुग्णांना चकरा मारण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.