दाहीदिशांना घुमला ‘जयभीम’चा नारा

By Admin | Updated: April 15, 2016 01:52 IST2016-04-15T01:34:06+5:302016-04-15T01:52:50+5:30

औरंगाबाद : ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय’ असा गगनभेदी जयघोष करीत लाखो आबालवृद्धांची क्रांतीचौकात गर्दी उसळली होती. दाहीदिशांनी ‘जयभीम’चा नारा घुमत होता.

Slow of 'Jayabhi' | दाहीदिशांना घुमला ‘जयभीम’चा नारा

दाहीदिशांना घुमला ‘जयभीम’चा नारा


औरंगाबाद : ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय’ असा गगनभेदी जयघोष करीत लाखो आबालवृद्धांची क्रांतीचौकात गर्दी उसळली होती. दाहीदिशांनी ‘जयभीम’चा नारा घुमत होता... ‘माझा भीमराव खरा, जसा कोहिनूर हिरा’ अशा भीमगीतांवर युवक नृत्य करीत होते... सर्वत्र आंबेडकरमय वातावरण निर्माण झाले होते... त्यामुळे ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशीच अनुभूती आली. यानिमित्ताने साऱ्यांना भीमशक्तीच्या विराटरुपाचे दर्शन घडले.
निमित्त होते, ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे. सायंकाळी क्रांतीचौकातील परिसर लाखो अनुयायांच्या गर्दीने फुलून गेला होता. हातात निळा झेंडा, डोक्यावर निळा फेटा, टोपी, पांढरेशुभ्र कपडे परिधान करून चोहोबाजूंनी भीमसैनिक क्रांतीचौकात येत होते. जयंती उत्सव समितीच्या व्यासपीठावरील भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पदमपुरा येथील मैत्रेयप्रणीत साहेब या झांज पथकाने उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले. एक मोठा पंचशील ध्वज व ८ निळे ध्वज घेऊन युवक पावली खेळत होते.
यावेळी ‘दुष्काळ, विधानभवनातील गोंधळ, अवयवदान’, या विषयांवरील देखावे चर्चेचा विषय ठरले. मथुरानगरमधील राजरत्न प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने दमदार सादरीकरण केले. यावेळी युवकांनी दोरीवर वेगवेगळ्या पद्धतीने उड्या मारून कसरती करून दाखविल्या.
उपाली विहार, बुद्धविहार येथील १०० मुला-मुलींच्या लेझीम पथकाने सर्वांची दाद मिळविली. नऊवार साडी नेसून मुली लेझीम खेळत होत्या. मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड, लेझीम, झांज पथके, डीजेच्या ठेक्यावर सारे थिरकत होते, बँड पथकाच्या तालावर तरुणांसोबत तरुणी व महिलाही नृत्य करताना दिसून आल्या. मिरवणूक क्रांतीचौक, नूतन कॉलनी, सिल्लेखाना, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, जुनाबाजारमार्गे भडकलगेट परिसरात पोहोचली.
‘मेरे भीमजी ने देखो कमाल कर दिया’
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या स्वागत कक्षासमोर डीजे लावण्यात आले होते.
‘जरी संकटांची काळरात्र होती... तरी भीमराया तुझी साथ होती’, ‘मेरे भीम जी ने देखो कमाल कर दिया’ अशी बाबासाहेबांची थोरवी गाणारी अनेक गाणी ऐकावयास मिळत होती. ‘जब तक सूरज चाँद रहेगा... बाबा तेरा नाम रहेगा’ अशा उत्स्फूर्त घोषणा अधूनमधून देण्यात येत होत्या.

मिरवणुकीत १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांची तलवारबाजी रंगली होती. ही मुले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर तलवारबाजीच्या स्पर्धेत बाजी मारलेले होते. तंत्रशुद्ध पद्धतीने तलवारबाजीने सर्वांना चकित केले. वॉरियर्स फेन्सिंग क्लब आणि औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे तलवारबाजी खेळण्यात आली.
क्रांतीचौक ते सिटीचौकापर्यंतच्या मिरवणूक मार्गावर ३८ व्यासपीठे उभारण्यात आली होती. यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मित्रमंडळांचा समावेश होता. प्रत्येक व्यासपीठावरील मान्यवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करीत होते.
चित्ररथाने शोभा वाढविली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत विविध कॉलन्या व शासकीय कार्यालयांतील जयंती उत्सव समितीतर्फे चित्ररथ आणण्यात आले होते. पदमपुरा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी व कामगार जयंती समितीच्या वतीने १२५ रुपये मूल्याच्या नाण्यांचा देखावा सादर करण्यात आला होता. रमानगर येथील नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने फिरती पृथ्वी व त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, असा देखावा सादर करण्यात आला. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या धर्तीवरील हा देखावा होता.

Web Title: Slow of 'Jayabhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.