प्रमुख उमेदवारांच्या झोपेचे खोबरे
By Admin | Updated: October 12, 2014 00:45 IST2014-10-12T00:35:54+5:302014-10-12T00:45:51+5:30
जालना : आपापल्या कार्यक्षेत्रात भल्या सकाळी घराबाहेर पडल्यापासून मध्यरात्री घरी परतेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मात्तबर उमेदवार गेल्या १५ दिवसांपासून अवघ्या २ ते ४ तासांचीच झोप घेत आहेत.

प्रमुख उमेदवारांच्या झोपेचे खोबरे
जालना : आपापल्या कार्यक्षेत्रात भल्या सकाळी घराबाहेर पडल्यापासून मध्यरात्री घरी परतेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मात्तबर उमेदवार गेल्या १५ दिवसांपासून अवघ्या २ ते ४ तासांचीच झोप घेत आहेत.
या विधानसभा निवडणुका सोप्या नाहीत. विशेषत: प्रस्थापितांकरिता त्या अडचणीच्या ठरल्या आहेत. कारण वर्षानुवर्षांपासून सत्तेत राहिलेल्या या प्रस्थापितांच्या विरोधात नवख्यांनी आव्हाने उभे केली आहेत. त्यांच्या विरोधात गरळ ओकून वातावरण पेटविण्याचा चंग बांधला आहे. भोकरदन, घनसावंगी, जालना या तीन मतदारसंघात हे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे. विशेषत: गावोगाव मोठी प्रचार यंत्रणा, संस्था, संघटनांसह कार्यकर्त्यांची तगडी फौज असतांना सुध्दा या प्रस्थापितांना गावा-गावातील राजकारणावर बारकाईने लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. प्रचार यंत्रणा सहजपणे उभारतांना स्वत: केलेल्या विकास कामांचा डांगोरा पिटावा लागतो आहे. तर स्वकीय पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे दूर करीत कामाला जुंपवितांना पडद्याआडच्या किंवा पडद्यावरच्या घडामोडींसह हालचालींवर बारीक लक्ष ठेवतांना उमेदवारांना नाकीनऊ येत आहेत.
लोकसभा निवडणुकीपासूनच आपापल्या कार्यक्षेत्रात सत्तारुढ विरोधी पक्षाचे हे प्रस्थापित सक्रिय झाले होते. विशेषत: गेल्या महिनाभरापासून या प्रस्थापितांनी प्रचंड मेहनत करीत भक्कम मोर्चेबांधणी केली. गेल्या पंधरा दिवसातून वातावरण पेटविण्यात हे प्रस्थापित यशस्वी झाले. आता चार दिवसांवर लढाई येवून ठेपली आहे. त्यामुळे हे प्रस्थापित सकाळी घराबाहेर पडल्यापासून रात्री उशिरा घरी परतेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. घरी परतल्यानंतर सुध्दा विश्वासू कार्यकर्त्यांच्या गराड्यात हे उमेदवार दिवसभरातील आढाव्यात गुंग होत आहेत. व्यवस्थापनात्मक बाबींसह खर्चाच्या गोष्टीही पडताळत आहेत. मध्यरात्री उशिरात झोप तीही काही तासांचीच असे चित्र आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पहाटे ४ ते ४.३० वाजेपर्यंत उठणे, ५.३० पर्यंत तयार होणे, ६ ते ७ दरम्यान निवासस्थानी किंवा प्रचार कार्यालयांमधून विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर दिवसभराच्या कार्यक्रमांबाबत चर्चेसह नियोजन, ७ वाजता घराबाहेर पडणे, ठरलेले गाव गाठून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर हितगुज, प्रतिष्ठीतांच्या भेटीगाठी, गावातील मैदाने किंवा पारांवर छोटेखानी सभा, गावातून पदयात्रा, तेथून पुढे दुसऱ्या नियोजित गावाकडे प्रस्थान.
दुपारी दोन-अडीच पर्यंत किमान सहा गावांना भेटी, कार्यकर्त्यांच्या शेतावर किंवा घरी जेवण, लगेच पुढील गावांना प्रस्थान, रात्री साडेनऊ दहापर्यंत आणखी पाच सहा गावांमधून प्रचार दौरा. ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारांचा हा दिनक्रम तर शहरी भागातील उमेदवार सकाळपासून दुपारपर्यंत ग्रामीण भागात व सायंकाळपासून शहरील विविध वसाहती व कॉलन्यांमधून बैठका, कॉर्नर सभा किंवा पदयात्रा वगैरे दौऱ्यात व्यस्त आहेत.