पैठणमध्ये सहा घरे फोडली

By Admin | Updated: June 3, 2014 01:10 IST2014-06-03T01:04:31+5:302014-06-03T01:10:44+5:30

पैठण : शहरातील गणेशघाट, रेणुकादेवी परिसरातील बाहेरगावी गेलेल्या सहा जणांच्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील किमती ऐवज चोरून नेला.

Six houses in Paithan | पैठणमध्ये सहा घरे फोडली

पैठणमध्ये सहा घरे फोडली

पैठण : शहरातील गणेशघाट, रेणुकादेवी परिसरातील बाहेरगावी गेलेल्या सहा जणांच्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील किमती ऐवज चोरून नेला. एकाच रात्री झालेल्या सहा घरफोडींमुळे जनतेत घबराटीचे वातावरण पसरले आहे. घरफोडी झालेले नागरिक बाहेरगावी असल्याने या घरांतून नेमके काय चोरीला गेले, हे अद्याप कळू शकले नाही. या सहा जणांपैकी एका जणाने पैठण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास पैठण शहरातील पाचपिंपळ गल्ली, गणेशघाट, रेणुकादेवी गल्ली परिसरातील कुलूपबंद असलेली घरे चोरट्यांनी टार्गेट केली. पाचपिंपळ गल्लीतील भाजपाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत पसारे यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने ते घराला कुलूप लावून मुलाबाळांसह देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट, जुन्या लोखंडी पेट्या तोडून त्यातील २५ हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच भागाला लागून असलेल्या गणेशघाट परिसरातील मधुकर दानशूर (खादगाव) यांचेही बंद असलेले घर कोंडा तोडून उघडले. घरातील कपाटातून ४ तोळे सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लांबविल्या. याच घरापासून काही अंतरावर असलेल्या डी.एड. कॉलेजमधील शिक्षक नागेश मारोती ठोंबरे यांचे घरही कुलूप तोडून उघडण्यात आले. या घरातील लोखंडी कपाट व सुटकेस चोरट्यांनी तोडली. कपाटात काहीच ऐवज नसल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. पाचपिंपळ गल्लीत राहणारे श्याम जोशी हे वैद्यनाथ बँकेत नोकरी करतात. त्यांच्या भाच्याची मुंज असल्याने ते घराला कुलूप लावून परभणी येथे गेले होते. त्यांच्या घराचा कोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील रोख १५ हजार रुपये, अर्धा तोळे सोने, देवाचे चांदीचे दागिने चोरून नेले. त्यांच्याच शेजारी राहणार्‍या सुमनबाई झाल्टे या देवदर्शनासाठी तीर्थयात्रेला गेल्या होत्या, त्यांचे घर फोडण्यात आले. या घरातून ४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या जावयाने सांगितले. त्याचप्रमाणे धायगुडे यांचेही घर फोडण्यात आले. ते अद्याप पैठणला आले नसल्याने तेथून काय चोरीला गेले, हे समजू शकले नाही. घटनेची खबर मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, गुड मॉर्निंग पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय सहाने, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत अलसटवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथकातील प्रशिक्षित डॉग स्विटी हिला पाचारण करण्यात आले. तिने चोरट्यांनी ज्या ओळीने तीन घरे फोडली त्या ओळीने प्रत्येक घरात जाऊन नंतर गागाभट्ट चौकापर्यंत चोरट्यांचा माग काढला. त्यामुळे गागाभट्ट चौकात वाहने लावून चोरटे पायीच या गल्लीतून फिरले असावेत. घरातील सामानावरून चोरट्यांच्या बोटांचे ठसे प्रिंटतज्ज्ञांनी घेतले आहेत. चार संशयित ताब्यात या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले. चोरट्यांचा तपास लवकरच लावू, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Six houses in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.