छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक वारंवार फुटणारे पाईप व तांत्रिक बिघाडांमुळे कोलमडत आहे. आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असताना महावितरणने शनिवार, २ ऑगस्ट रोजी ६ तासांच्या शटडाऊनची परवानगी मागितली आहे.
फारोळा येथे महावितरण कंपनीतर्फे सहा तासांत आवश्यक कामे करण्यासाठी शटडाऊनला मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने फारोळा येथे ७०० आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीसाठी वीजजोडणीच्या वायरिंगचे काम करण्यासाठी सहा तासांचा शटडाऊन देण्याची मागणी प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे केली होती. त्यानुसार शनिवार, २ ऑगस्ट रोजी सहा तासांचा शटडाऊन घेण्याची परवानगी मनपा प्रशासकांनी दिल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले. दरम्यान, सहा तासांच्या शटडाऊनमुळे सातशे, नऊशे व बाराशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहरातील पाण्याचे वेळापत्रक पुन्हा लांबणीवर पडणार आहे.