माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरी करणारे सहा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:22 IST2017-10-03T00:22:20+5:302017-10-03T00:22:20+5:30

शहरातील माजी उपनगराध्यक्ष रामराज रांजवण यांच्या घरी पडलेल्या दरोड्यातील सहा आरोपींना पकडण्यास शहर पोलिसांना पंधरा दिवसानंतर यश आले.

Six dacoits arrested | माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरी करणारे सहा गजाआड

माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरी करणारे सहा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील माजी उपनगराध्यक्ष रामराज रांजवण यांच्या घरी पडलेल्या दरोड्यातील सहा आरोपींना पकडण्यास शहर पोलिसांना पंधरा दिवसानंतर यश आले. मिरज (जि.सांगली) येथील पोलिसांनी पकडलेल्या एका गुन्ह्यात कोठडी दरम्यान माजलगाव येथे दरोडा टाकल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी त्यांना अटक करून माजलगाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
झेंडा चौक पाटील गल्ली येथील रहिवासी माजी उपनगराध्यक्ष रामराज रांजवण यांच्या घरी १४ सप्टेंबर रोजी अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून लाखो रूपयांचा सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड पळवली होती. याप्रकरणी शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी प्रयत्न करून ही चोरट्यांचा सुगावा लागत नव्हता. अखेर मिरज पोलिसांनी दरोड्यांच्या तयारीत असलेल्या पाच चोरट्यांना अटक केली होती. सदर चोरांनी माजलगाव येथील रांजवण यांच्या घरी दरोडा टाकल्याचा संशय होता. यावरून शहर पोलिसांना सदर चोरट्यांना २७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर प्रकरणाचा तपास केला असता, शहराच्या बाजुला असलेल्या केसापुरी वसाहत येथील कुख्यात दरोडेखोर उत्तम काशिनाथ गायकवाड हा या घटनेचा ‘मास्टर मार्इंड’ असल्याचे समोर आले. यानेच त्या चोरट्यांना रांजवण यांचे घर दाखवून चोरीची ‘प्लॅनिंग’ सांगितली. त्यानंतर भास्कर साहेबराव शिंदे, अण्णा मारोती शिंदे, अंकुश मारोती शिंदे, किरण अशोक जाधव (सर्व रा.मंगरूळ ता.मठा जि.जालना) व संजय तुकाराम गायकवाड (रा.भोकरदन जि.जालना) या सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोराडे, पोलीस उपअधीक्षक भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे, दिलीप तेजनकर, शहर ठाण्याचे पोनि राजीव तळेकर, पोउपनि विकास दांडे, पोलीस नाईक भालेराव, शिनगारे, बेले, तनपुरे, अंकुशे यांनी केली.

Web Title: Six dacoits arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.