आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे...
By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 20, 2023 16:05 IST2023-10-20T16:05:07+5:302023-10-20T16:05:26+5:30
इस्कॉन व्हीईसीसीत राम-सीतेचा विवाह सोहळा धूमधडाक्यात

आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे...
छत्रपती संभाजीनगर : रावणासारखा बलशाली राजाही धनुष्य उचलू शकला नाही. तिथे श्रीरामाने सहजपणे शिवधनुष्य उचलले. हा पराक्रम पाहून सीताही भारावून गेली आणि सीतेने श्रीरामास माळ घातली व सीतेचे स्वयंवर लागले... मंगलाष्टक म्हटले गेले. मंगलवाद्य वाजविण्यात आले... उपस्थित भाविकांनी नृत्य करीत आनंदोत्सव साजरा केला. .. हा प्रसंग इस्कॉन व्हीईसीसीत आयोजित ‘रामलीला महोत्सवातील’ होता.
नवरात्रोत्सवानिमित्त रामलीला महोत्सवाला पहिल्या माळेपासून सुरुवात झाली आहे. पूर्वी रामायण आयोजित केले जाई, तेव्हा पाठीमागील बाजूस विविध पडदे लागलेले असत. आता पडद्याची जागा एलईडी वॉलनी घेतली आहे. स्टेजवर कलाकार रामायण सादर करीत असतात, तर पाठीमागील बाजूस एलईडीवर रामायणातील प्रसंगानुसार देखावे दाखविले जात आहेत. ही रामलीला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी येथे होत आहे. तिसऱ्या दिवशी रामलीलेतून गुरुप्रती सेवाभाव आणि प्रभू श्रीरामांचा स्थिर भाव प्रदर्शित करण्यात आला. गंगा अवतरण, जनकपूर दर्शन, धनुष्य यज्ञ व सीता स्वयंवर असे एकानंतर एक प्रसंग पाहण्यात भाविक हरखून गेले होते. बुधवारी चौथ्या दिवशी सीता स्वयंवर, लक्ष्मण-परशुराम संवाद, श्रीराम विवाह या लीलांचे सादरीकरण करण्यात आले. मूळ हिंदीतून कलाकार ही रामलीला सादर करीत आहेत. मात्र, अधूनमधून ‘मराठी’ संवादही ते म्हणत असल्याने प्रेक्षकही जाम खूश होत आहेत. जणू काही खऱ्याखुऱ्या लग्न सोहळ्याला आपण हजर आहोत, असे सर्वांना वाटत होते.
विजयादशमीच्या दिवशी रामलीलाची सांगता
इस्कॉनच्या वतीने आयोजित रामलीलाची सांगता मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी होणार आहे. रावणदहन व श्रीरामराज्याभिषेक प्रसंग दाखविण्यात येणार आहे. जालना रोडवरील वरुड फाटा येथे इस्कॉन व्हीईसीसीमध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता ‘रामलीला’ सुरू होते. यानंतर महाप्रसाद वाटप केला जात आहे.