साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:05 IST2021-03-31T04:05:06+5:302021-03-31T04:05:06+5:30

औरंगाबाद : कोरोना महामारीपासून रुग्णांना वाचविण्यासाठी कोरोनायोद्धे ‘जान की बाजी’ लावत आहेत. मात्र, रुग्णसेवेला प्रारंभ करताच त्यांचे संपूर्ण ...

Sir, let's die with PPE kit, not Corona! | साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !

साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !

औरंगाबाद : कोरोना महामारीपासून रुग्णांना वाचविण्यासाठी कोरोनायोद्धे ‘जान की बाजी’ लावत आहेत. मात्र, रुग्णसेवेला प्रारंभ करताच त्यांचे संपूर्ण शरीर काही वेळातच घामाघूम होते तर काहींचा जीव गुदमरतो. काही परिचारिका, टेक्निशियन तर भोवळ येऊन खाली पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, याची पर्वा न करता, तसेच कोणाकडे तक्रार न करता कोरोनायोद्धे आपला निग्रह ढळू न देता संयमाने काम करत आहेत. तो त्रास सुरू होतो पीपीई किट घातल्याने. हो, कोरोना योद्धांना पीपीई किटमुळे जास्त त्रास होत आहे.

चिकलठाणा सिव्हील हॉस्पिटल, एन ७ येथील कोरोना तपासणी केंद्र, घाटी तसेच औरंगपुरा येथील मनपा आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली असता कोरोना योद्धांना होणाऱ्या त्रासाचे हे सत्य समोर आले.

प्लास्टिक कोटेड पीपीई किट घालून डॉक्टर, परिचारिका, टेक्निशियन अन्य कर्मचारी जे कोरोना रुग्णाच्या सेवेत आहेत, त्यांना सलग ८ ते १० तास काम करावे लागते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात हे पॅकबंद पीपीई किट घालावे लागतात. त्यामुळे शरीर घामाघूम होते. अनेकांना शरीरातील पाणी कमी होणे, शुगर कमी होण्याचा त्रास होत आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रातील बहुतांश डॉक्टर, परिचारिका यांनी पीपीई किट घालणे बंद केल्याचे निदर्शनास आले आहे.

'' कोरोनाने नव्हे तर आम्ही हे पीपीई किट घालून मरू, '' असे म्हणत घाटीतील एका परिचारिकेने आपला संताप व्यक्त केला.

चौकट

चक्कर येऊन पडले

मागील वर्षी पहिल्यांदा पीपीई किट घातले ते चांगले होते. त्याच्याने जीव गुदमरत नव्हता. मात्र, सध्याच्या पीपीई किटने जीव गुदमरतो आहे. मागील महिन्यात मी पीपीई किट घातले व ३ तासांनंतर चक्कर येऊन खाली पडले. यामुळे अनेक परिचारिका, आरोग्यसेविका, कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालणे बंद केले.

परिचारिका, मनपा आरोग्य केंद्र

-----

शरीरातील पाणी होते कमी

पीपीई किट घातल्यानंतर अर्ध्या ते एक तासाने संपूर्ण शरीर घामाने ओलेचिंब होते. शरीरातील पाणी व शुगरचे प्रमाण कमी झाल्यासारखे होते.

सिव्हील हॉस्पिटल, चिकलठाणा

----

उन्हाळ्यात पीपीई किट घालणे अशक्य

उन्हाळ्यात प्लस्टिकचे पीपीई किट घालणे अशक्य आहे. दोन तासाने पीपीई किट बदलण्यात यावे. परिचारिका कमी असल्याने एक परिचारिकाला सलग ८ ते १० तास काम करावे लागते, ते पीपीई किट घालून, यामुळेच परिचारिका आजारी पडत आहेत.

परिचारिका, घाटी

---

पीपीई किटचा दर्जा चांगला

मागील वर्षी सुरुवातीला जे पीपीई किट आले व आताचे पीपीई किट यांच्या दर्जात मोठा फरक आहे. दिवसेंदिवस पीपीई किटची गुणवत्ता सुधारत आहे. कुठेही पीपीई किट लिकेज नसल्याने घाम येतो.

डॉ. सुंदर कुलकर्णी

जिल्हा शल्यचिकित्सक

---

आकडेवारी

एकूण बाधित ८०,०२१

उपचार सुरू १५,७०६

बरे झालेले रुग्ण ६२,७०७

कोरोनाचे एकूण बळी १,६०८

Web Title: Sir, let's die with PPE kit, not Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.