साहेब दया दाखवा, माल विकला नाही तर मुले उपाशी राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:31+5:302021-06-28T04:04:31+5:30

औरंगाबाद : ‘चार महिन्यांपासून आठवडी बाजार बंद आहे, साहेब आम्हाला व्यवसाय करु द्या, किती दिवस घरात बसणार, आता दुकानदार ...

Sir, have mercy, if the goods are not sold, the children will go hungry | साहेब दया दाखवा, माल विकला नाही तर मुले उपाशी राहतील

साहेब दया दाखवा, माल विकला नाही तर मुले उपाशी राहतील

औरंगाबाद : ‘चार महिन्यांपासून आठवडी बाजार बंद आहे, साहेब आम्हाला व्यवसाय करु द्या, किती दिवस घरात बसणार, आता दुकानदार उधार देईना, कपडे विकले नाही तर आमचे सोडा पण मुलं-बाळं उपाशी राहतील’, आमच्यावर दया करा, असे विक्रेते विनवणी करते होते. मात्र, पोलिसांना कायद्याचे पालन करण्यासाठी त्या विक्रेत्यांना आठवडी बाजारातून हाकलून द्यावे लागले.

मागील चार महिन्यांपासून आठवडी बाजार बंद आहे. शेकडो किरकोळ विक्रेत्यांचा फक्त आठवडी बाजारातील व्यवहारावरच उदरनिर्वाह चालतो. व्यवसाय बंद व उधारी डोंगराएवढी झाल्याने जगणे कठीण झाले. अखेर या विक्रेत्यांच्या संयमाचा बांध रविवारी फुटला व बंदी असतानाही अनेक विक्रेते रविवारच्या आठवडी बाजारात येऊन बसले; मात्र पोलिसांनी आदेशाचे पालन करीत या विक्रेत्यांना जागेवरुन हटविले.

जुन्या मोंढ्यातील ऐतिहासिक जाफरगेट परिसरात ७० च्या दशकापासून नियमित रविवारचा आठवडी बाजार भरविला जातो. शहरात असे शेकडो किरकोळ विक्रेते आहेत ते फक्त शहरातील विविध भागांत रविवार, सोमवार, गुरुवार व शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारातच भाजीपाला, फरसाण, कटलरी, सेकंड हँड साड्या, फॅक्टरीतून रिजेक्ट केलेले कपडे आदी विकून आपला उदरनिर्वाह करतात; मात्र कोरोनामुळे मार्चपासून दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरु झाले आणि त्यात आठवडी बाजार तात्पुरतेच बंदचे आदेश देण्यात आले. यास आता चार महिने पूर्ण होत आहेत. चार महिन्यांपासून धंदा बसल्याने विक्रेते हैराण झाले आहेत. त्यांच्यावर उधारी वाढली आहे. यामुळे आज बंदी असतानाही अनेक विक्रेत्यांनी भाजीपाला, फळे, फरसान, कपडे, हार्डवेअरचे सेकंड हँड सामान विक्रीला आणले होते. २० टक्के बाजार भरला होता. जुन्या साड्या, ड्रेस खरेदीसाठी गरीब महिलांची झुंबड उडाली होती, तिथे ग्राहकांची गर्दी वाढताच त्याची खबर क्रांतीचौक पोलीस स्टेशनला गेली. दुपारी १२ ते १२.३० वाजेदरम्यान पोलिसांनी विक्रेत्यांना हटविण्यास सुरुवात केली. ‘आमची मुले उपाशी आहेत, साहेब आम्हाला व्यवसाय करु द्या, किती दिवस घरात बसणार, आता दुकानदार उधारी देईना, आमचे सोडा पण मुलं-बाळं उपाशी राहतील, अशी विनवणी विक्रेते करीत होते. पण कायद्याचे पालन करण्यासाठी पोलिसांना त्या विक्रेत्यांना तेथून हटवावे लागले.

चौकट

पोटावर पाय देऊ नका

आम्ही गल्लोगल्ली फिरुन भांड्याच्या बदल्यात साड्या, ड्रेस खरेदी करतो व तो रविवारच्या आठवडी बाजारात विकतो. त्या पैशांवरच घरची चूल पेटते. चार महिने झाले आठवडी बाजार बंद आहेत. किती दिवस घरात बसणार. आता घर खायला उठले आहे. दुकानदारांनी उधारी बंद केली आहे. आठवडी बाजार काही तासासाठी सुरु करा.

सुलभा गायकवाड

कॅप्शन

गांधीनगरच्या समोरील भागात जुन्या साड्या, कपडे खरेदी करताना महिला.

Web Title: Sir, have mercy, if the goods are not sold, the children will go hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.