सिल्लोड, कन्नड आगाराच्या बसला नाचनवेलचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:56+5:302021-02-06T04:07:56+5:30
नाचनवेल : प्रवासी संख्येच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळासाठी सिल्लोड ते कन्नड मार्गावरील नाचनवेल हे एक महत्त्वपूर्ण गाव आहे. येथूनच ...

सिल्लोड, कन्नड आगाराच्या बसला नाचनवेलचे वावडे
नाचनवेल : प्रवासी संख्येच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळासाठी सिल्लोड ते कन्नड मार्गावरील नाचनवेल हे एक महत्त्वपूर्ण गाव आहे. येथूनच औरंगाबाद-पाचोरा हा वर्दळीचा राज्यमार्ग जातो; परंतु सिल्ल्लोड व कन्नड आगाराच्या अनेक एसटी बस गावात न येता परस्पर चौफुलीवरून निघून जात असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नाचनवेलमध्ये यापूर्वी खराब रस्त्याचे निमित्त पुढे करून बसचालक बस गावात आणायचे टाळत होते. आता रस्ता तुलनेने बरा असूनही बस गावात न येण्याचे कारण गावकऱ्यांना अद्यापही उमजलेले नाही. यामुळे बस पकडण्यासाठी गावातील विद्यार्थ्यांना जवळपास दीड कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे बिरुद मिरविणाऱ्या एसटी आगारांच्या या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे. याबाबत कन्नडच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी बसचालकांना सूचना देण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. तर सिल्लोडच्या आगारप्रमुखांनी फोन उचलण्याचेही सौजन्य दाखवले नाही. एसटी महामंडळ वर्षानुवर्षे तोट्यात चालत असतानाही प्रवासी हित लक्षात न घेता कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी मनमानी हे न उलगडणारे कोडे आहे. बस गावात न येण्याचे सत्र असेच सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
कोट..
शाळेत जाण्यासाठी आम्ही दररोज नाचनवेल ते पिशोर असा बसने प्रवास करतो; मात्र अनेक बस चौफुलीवरून परस्पर निघून जात असल्याने तासनतास वाट बघावी लागते किंवा सिल्लोड-कन्नड मुख्य रस्त्यापर्यंत पायी चालत जावे लागते. परत येतानाही वाहक, चालक बस गावात न नेता वृद्धांशी वाद घालतात.
- संजीवनी प्रकाश थोरात (विद्यार्थिनी)
फोटो कॅप्शन : सिल्लोड व कन्नड आगाराच्या अनेक एसटी बस नाचनवेल गावात न येता परस्पर चौफुलीवरून निघून जातात.