देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून औरंगाबाद येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, भजन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, इंटकचे ॲड. इक्बालसिंग गिल, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र काळे, झकिया बेगम, राहुल शिरसाट, शिवाजी चिंचोले, युनूस खान, हमाल मापाड्यांचे नेते साथी सुभाष लोमटे, आयटकचे नेते कॉम्रेड राम बाहेती, सीटूचे श्रीकांत फोपसे, माकपचे कॉम्रेड भगवान भोजने, कॉ. अभय टाकसाळ, भाकपचे कॉ. बुद्धिनाथ बराळ, साथी अण्णा खंदारे, सुलभा खंदारे, जनता दलाचे अजमल खान, शेकापचे उमाकांत राठोड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव देणे कायद्याने बंधनकारक करण्यात यावे, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कोरोनाचे संकट असेपर्यंत असंघटित कष्टकऱ्यांना माणशी दरमहा दहा किलो धान्य, डाळी, तेल, साखर वा गूळ मोफत पुरविण्यात यावा, एक देश एक वेतनप्रणाली मान्य करून असंघटित कष्टकऱ्यांना चतुर्थ श्रेणीचे वेतन हे किमान वेतन म्हणून देण्यात यावे, जात-धर्म, लिंगावरून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला सर्वप्रथम पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.