शैक्षणिक शुल्क माफीसाठी आता स्वाक्षरी मोहीम
By Admin | Updated: November 29, 2015 23:16 IST2015-11-29T23:09:07+5:302015-11-29T23:16:26+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम गेले आहेत.

शैक्षणिक शुल्क माफीसाठी आता स्वाक्षरी मोहीम
उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम गेले आहेत. त्यामुळे शेतकरी प्रंचड आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले आहे. असे असतानाही शासनाकडून केवळ परीक्षा शुल्क माफ केले जात आहे. वास्तविक परीक्षा शुल्क नाममात्र असते. त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शुल्क माफ करावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवर आधारीत आहे. त्यामुळे जवळपास ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुले शिक्षण शुल्क भरण्यासाठी असमर्थ असल्या कारणाने शिक्षण बंद करु लागली आहेत. मध्यंतरी शासनाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केल्याची घोषणा केली. परंतु ही केवळ घोषणाच राहिल्याने कळंब तालुक्यातील काही महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरण्यासाठी लागणारी नाममात्र रक्कम नसल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले. वास्तविक पाहता परीक्षा शुल्क हे अतिशय नाममात्र असते. मात्र शिक्षण शुल्क हे कित्येक पटीने अधिक असते. जे विद्यार्थी परीक्षा शुल्क भरु शकत नाहीत त्यांना शिक्षण शुल्क भरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांच्या सह्या घेवून हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. राणाजगजितसिंह पाटील हे देणार आहेत. याउपरही शासनाने परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)