महसूल संपाचा प्रवेश प्रक्रियेला साईड इफेक्ट !
By Admin | Updated: August 7, 2014 01:41 IST2014-08-07T01:33:00+5:302014-08-07T01:41:25+5:30
लातूर : मराठा व मुस्लिम समाजाला नुकतेच आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या तंत्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे.

महसूल संपाचा प्रवेश प्रक्रियेला साईड इफेक्ट !
लातूर : मराठा व मुस्लिम समाजाला नुकतेच आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या तंत्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे. परंतु, महसूलचा संप सुरू असल्याने प्रमाणपत्र वितरण व प्रस्ताव स्वीकारण्याची यंत्रणाच बंद पडली आहे. त्यामुळे मराठा व मुस्लिम समाजासह आरक्षित जागेवरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१ आॅगस्टपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात तहसीलदारांसह नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जात प्रमाणपत्रासाठी १ आॅगस्टपूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावावरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अनेक मराठा व मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळू शकले नाही. त्यातच इकडे तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आरक्षणातून प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची गरज लागते. मात्र जिल्ह्यातील दहाही तालुक्यांतील तहसीलचे काम संपामुळे ठप्प झाले आहे. प्रमाणपत्र देणे व प्रस्ताव स्वीकारणे हे कामकाज बंद आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडे पत्र पाठविले आहे. महसूलचा संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु, अद्याप तसे तंत्र संचालनालयाकडून काही निर्देश नाहीत. १४ आॅगस्टपर्यंतच प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. १४ आॅगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. परंतु, इकडे संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही मिळाल्यास सनदशीर मार्गाने मोठे आंदोलन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद उभा करेल. जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारीच संघटनेचे शिष्टमंडळ भेटले आहे. त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना पत्र पाठविले आहे.
४मुदतवाढ मिळाली तर ठिक आहे. परंतु, समाजाच्या हितासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप मागे घेणे हिताचे ठरेल, असे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष विद्याधर कांदे-पाटील म्हणाले.