सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला अवकळा!
By Admin | Updated: July 29, 2014 01:14 IST2014-07-29T00:53:43+5:302014-07-29T01:14:00+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला अवकळा आली आहे. संग्रहालयातील प्राण्यांचे पिंजरे खराब झाले आहेत.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला अवकळा!
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला अवकळा आली आहे. संग्रहालयातील प्राण्यांचे पिंजरे खराब झाले आहेत. अंतर्गत रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा करणारी यंत्रणा मोडकळीस आली आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजूर केलेला ५० कोटी रुपयांचा आराखडा निधीअभावी १ वर्षापासून धूळखात पडला आहे. पावसाळ्यामुळे पिंजऱ्यांना गळती लागली आहे. ससे, कासव, हरीण, माकडांचे पिंजरे खराब झाले आहेत.
पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
उपमहापौर संजय जोशी, सभागृह नेते किशोर नागरे यांनी सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एच. नाईकवाडे यांची उपस्थिती होती. केंद्र शासनाकडून प्राणिसंग्रहालयाला निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमहापौर जोशी यांनी सांगितले.
कुणी केला आराखडा
विद्यापीठ प्राणिशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.जी.डी.खेडकर यांनी प्राणिसंग्रहालयाच्या विकासाचा मास्टर प्लान तयार केला आहे. १० वर्षांसाठी असलेला हा प्लान केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजूर केला असून, त्यानुसार काम करण्यासाठी ५० कोटी रुपये लागतील. त्यातील ३० कोटी रुपये प्राणिसंग्रहालय विकसित करण्यावर खर्च होतील.
मिटमिट्याची जागा अधांतरी
मिटमिट्यात १०० एकर जागा मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, ती जागा सध्या मिळणे अवघड आहे. त्यामुळे २० एकर जागा ताब्यात घेऊन ३४ एकरमध्ये प्राणिसंग्रहालय बांधण्यात येणार आहे. सध्या १४ एकरमध्ये प्राणिसंग्रहालय आहे.
काय आहे आराखड्यात
संग्रहालयाची सुरक्षा भिंत ५० लाख, ड्रेनेज, पाणी, वीजपुरवठा, सेव्हेज नियोजनासाठी दीड कोटी रुपये, ५० हजार लिटरच्या जलकुंभासाठी २० लाख रुपये, पार्किंग, सर्व्हिस रोड, लाईट, इमारतींसाठी ७० लाख रुपये, मुख्य रस्त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद दाखविली आहे. २९ कोटी २४ लाख रुपयांचा तो आराखडा आहे.
१० वर्षांत काय लागणार
मनपाला २०१४ पर्यंत प्राणिसंग्रहालय व उद्यान व्यवस्थापनासाठी ३० कोटी रुपये लागतील. उत्पन्न २६ कोटी रुपये मिळेल. ४ कोटी रुपयांनी संग्रहालय नुकसानीत चालेल. असे डॉ.नाईकवाडे यांनी सांगितले.
संग्रहालयातील प्राणिसंपदा
सध्या संग्रहालयात वाघ ५, पांढरे वाघ ४, बिबट्या मादी १, हत्ती २, अस्वल २, नीलगाय ८, सांबर ३५, काळवीट ४२, चितळ २, तडस ३, लांडगा १, सायाळ ४, उदबिल्ला ५, इमू २, पानपक्षी २८, माकड ३, मगर ९ , चांदणी कासव ४९, पाण्यातील कासव ५ व १३ जातींचे ८८ सर्प आहेत.
सर्पालयाला भगदाड; मत्स्यालयाला गळती
महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील सर्पालयाला भगदाड पडले आहे, तर मत्स्यालयाला गळती लागली आहे. १८ वर्षांपासून उद्यानाचे आकर्षण असलेले हे दोन्ही घटक लयाला जात असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
सर्पालय व मत्स्यालय १९९६ मध्ये बांधण्यात आले. त्याची अवस्था सध्या अतिशय बिकट झालेली आहे. सर्पालयात १३ जातींचे ८८ सर्प आहेत. बहुतांश सर्पांचे पिंजरे खराब झाले आहेत. काचा फुटल्या आहेत. आच्छादनाला गळती लागली आहे. काही सर्प मरणासन्न अवस्थेत पडून राहतात. त्याकडे कर्मचारी ढुंकूनही पाहत नाहीत.
मराठवाड्यातील एकमेव असे प्राणिसंग्रहालय म्हणजे सिद्धार्थ उद्यान; परंतु या उद्यानातील प्राणिसंग्रहालयाला सध्या काँक्रिटच्या जंगलाने वेढा घातला आहे. त्यामुळे प्राण्यांसाठी जागा अपुरी पडत आहे.
१८ वर्षांपासून प्रजनन बंद
सापांची अंडी १८ वर्षांपासून नाल्यात किंवा उद्यानाच्या आवारात फेकली जात आहे. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नाईकवाडे यांनीच स्वत: ती बाब कबूल केली. कारण सापांच्या पिलांची संख्या वाढली, तर त्यांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे सापांनी अंडी घातली की, ती नाल्यामध्ये फेकून दिली जातात. त्याचे पुढे काय होते. यावर काहीही सांगता येणे अवघड आहे.
मत्स्यालय मोडकळीस
प्राणिसंग्रहालयातील मत्स्यालय मोडकळीस आले आहे. फिशपॉट खराब झाले असून, मत्स्यालय नवीन करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च लागेल. सर्पालय नूतनीकरणासाठी देखील दीड कोटी रुपये लागतील. असे डॉ.नाईकवाडे यांनी सांगितले.