भाविकांचे श्रध्दास्थान तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर वडगाव
By Admin | Updated: August 3, 2014 01:15 IST2014-08-03T00:46:21+5:302014-08-03T01:15:35+5:30
उस्मानाबाद : ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वडगाव सिध्देश्वर येथील श्री सिध्देश्वरांच्या दर्शनासाठी केवळ श्रावणमासातच नव्हे

भाविकांचे श्रध्दास्थान तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर वडगाव
उस्मानाबाद : ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वडगाव सिध्देश्वर येथील श्री सिध्देश्वरांच्या दर्शनासाठी केवळ श्रावणमासातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने भाविकांची गर्दी असते़ ‘क’ दर्जा मिळालेल्या या तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, इथे विविध विकास कामे सुरू आहेत़
सिध्देश्वर मंदिराबाबत एक अख्यायिका सांगितली जाते़ वडगाव परिसरात पूर्वी इसापूर नगरी होती़ इसापूर नगरीच्या राजाकडे अनेक गायी होत्या़ गायी वनात चरण्यासाठी सैनिक नेत असत़ मात्र, यातील एक गाय आपल्या वासराला दूध पाजत नव्हती़ गाय दूध का पाजत नाही, याची माहिती घेण्यासाठी राजाने सैनिकांना सांगितले होते़ सैनिकांनी त्या गायीवर नजर ठेवली असता, ती गाय एका वारूळावर दूध सोडत असल्याचे दिसून आले़ याची माहिती मिळताच राजाने उत्सुकतेने त्या वारूळाच्या जागी उत्खनन केले़ त्यावेळी शंभू महादेवाच्या जवळपास सात पिंडी तेथे आढळून आल्या़ राजाने काही दिवसातच तेथे भव्य मंदिर उभारून परिसराचा जीर्णोध्दार केला़ तेव्हापासून आजपर्यंत परिसरातील हजारो भाविक सोमवारसह शिवरात्री, श्रावण मासात दर्शनासाठी वडगाव येथे येतात़ इसापूर राजाची मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या नागझरी कुंडाजवळ समाधीही आहे़ वडगाव सिध्देश्वर गावात व मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त चार ते पाच दिवस विविध उपक्रम राबविले जातात़ धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे या कालावधीत आयोजन केले जाते़ पहिल्या श्रावण सोमवारीही येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ श्रावणातील प्रत्येक दिवस येथे दर्शनासाठी गर्दी असते़ ऐतिहासिक मंदिर आणि परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांचा ओढा वडगावकडे वाढला आहे़
इथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नळ योजनेद्वारे करण्यात आली आहे़ तर इतर कामेही सुरू आहेत़ भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी व वर्षभरातील उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंदीर ट्रस्टी परिश्रम घेत आहे. (प्रतिनिधी)
पालखी मार्गाचे डांबरीकरण आवश्यक
महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात येणारी पालखी गाव ते मंदिरापर्यंत काढण्यात येते़ सध्या या कच्च्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम सुरू आहे़ मात्र, दररोजची वर्दळ पाहता हा रस्ता डांबरीकरण किंवा सिमेंटचा करण्याची गरज आहे़ तुळजापूरच्या धर्तीवर दर्शन मंडप सध्या मंदिराजवळ दर्शन मंडपाचे काम सुरू आहे़ मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर ट्रस्टकडून तुळजापूरच्या धर्तीवर दर्शन मंडप उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे़ त्या पध्दतीची जागा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले़
विकासकामे सुरू
मंदिराच्या वर मंगल कार्यालयाचे तर खाली दर्शन मंडपाचे काम सुरू आहे़ याशिवाय इतर विकास कामांबाबत प्रशासनाकडे मंदिर ट्रस्टसह भाविकांकडून पाठपुरावा केला जात आहे़