श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी! १० दिवसांत २४५ कि.मी पायी वारीसाठी २५० वारकरी रवाना
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 22, 2023 13:41 IST2023-12-22T13:41:03+5:302023-12-22T13:41:36+5:30
श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी या गजानन महाराज पायी पालखीत अनेक भाविक सहभागी .

श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी! १० दिवसांत २४५ कि.मी पायी वारीसाठी २५० वारकरी रवाना
छत्रपती संभाजीनगर : ‘अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सदगुरू संत श्री गजानन महाराज की जय’ असा जयघोष केला जात होता.. रस्त्यावर सडा-रांगोळी काढली जात होती. पालखीवर पुष्पवृष्टी केली जात होती. जागोजागी भाविक पालखीचे दर्शन घेत होते. गुरुवारी श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी ही पायी पालखी विदर्भाची पंढरी शेगावकडे रवाना झाली. या पालखीचे वैशिष्ट्ये म्हणजे यात आजी-माजी २५० कर्मचारी, अधिकारी वारकरी, १० दिवसांत २४५ कि.मी. पायी चालून श्रीक्षेत्र शेगावात पोहोचणार आहेत.
जप करीत महाराजांचा मुखवटा आणला मंदिराबाहेर
गारखेड्यातील श्री गजानन महाराज मंदिरात महाराजांचा चांदीचा मुखवटा आहे. गुरुवारी ‘गण गण गणात बोते’ असा जप करीत सकाळी अध्यक्ष प्रा. प्रवीण वक्ते यांनी श्रींचा मुखवटा मंदिराबाहेर आणला. त्यानंतर सजविलेल्या पालखीत तो मुखवटा ठेवण्यात आला. यावेळी जमलेल्या हजारो भाविकांनी ‘गजानन महाराज की जय’ असा गगनभेदी जयघोष केला.
पहिला मुक्काम सावंगीला
गजानन महाराज मंदिरापासून पायी पालखी यात्रेला सुरुवात झाली. समोरील बाजूस महिला व पुरुष वारकरी हातात भगवा ध्वज घेऊन पुढे चालत होते. टाळ व मृदंगाच्या तालावर धार्मिक गाणे म्हटले जात होते. पांढऱ्या शुभ्र वेशभूषेत खांद्यावर शबनम लटकविलेली असे २५० कर्मचारी-अधिकारी भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पाठीमागील बाजूस श्रींची पालखी होती. जालना रोड, कॅनॉट प्लेस परिसर, आविष्कार कॉलनी चौक, बजरंग चौक, जळगाव रोड मार्गे सावंगी येथे दिंडी पोहोचली.
३० डिसेंबरला पोहोचणार शेगावला
श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी या गजानन महाराज पायी पालखीचे यंदा १५ वे वर्ष. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, दुधाघाट, बुलढाणा, खामगाव मार्गे ३० डिसेंबरला पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे. तिथे गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सर्व भाविक छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील.