एसडीएम, तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा
By Admin | Updated: January 15, 2016 00:12 IST2016-01-14T23:43:27+5:302016-01-15T00:12:09+5:30
औरंगाबाद : सातबाराचे संगणकीकरण करून आॅनलाईन अपलोड करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि एसडीएम यांना जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या

एसडीएम, तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा
औरंगाबाद : सातबाराचे संगणकीकरण करून आॅनलाईन अपलोड करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि एसडीएम (उपविभागीय अधिकारी) यांना जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा संगणकीकरण करण्याचे काम जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
खुलताबाद, फुलंब्री आणि कन्नड या ३ तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर संगणकीकृत सातबाराचे काम करण्यात आले असले तरी या तालुक्यातील हजार ते दीड हजार नोंदी घेण्याचे काम रखडले आहे. औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर, सोयगाव, सिल्लोड या ६ तालुक्यांतील आॅनलाईन सातबाराचे काम आॅफलाईन झाल्यामुळे नागरिकांना सातबारा घेण्यासाठी तलाठ्यांकडे चकरा माराव्या लागत असून, तलाठ्यांचे दप्तर आॅनलाईन सातबारा करण्यासाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
राज्य सरकारने संगणकीकृत सातबारा देण्याचा निर्णय २००३ साली घेतला. २००९- १० या वर्षात एनआयसीमार्फत संगणकीकृत सातबारा देण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या आधारे २०१३ व २०१४ या वर्षातील सातबारा आॅनलाईन करण्यात आले. सातबारा आॅनलाईन करण्याचे काम खाजगी संस्थेकडे देऊन ते पूर्ण केले जात होते. त्यानंतर मात्र, मार्च २०१४ पासून आॅनलाईन सातबाराचे काम रेंगाळल्याने जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचे हस्तलिखित सातबारा तयार करून द्यावे लागतील. यामध्येही प्रचंड घोळ झाला असून, जुन्या सातबाराच्या आधारे जमिनींचे २ ते ३ वेळेस खरेदी- विक्रीचे व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत.