३५ तलावांमध्ये ठणठणाट
By Admin | Updated: July 23, 2014 00:29 IST2014-07-22T23:03:22+5:302014-07-23T00:29:40+5:30
दिनेश गुळवे , बीड जस-जसे पावसाळ्याचे दिवस पुढे सरकत आहेत, तस-तसे जिल्ह्यातील तलावातील पाणीपातळी तळ गाठू लागली आहे.

३५ तलावांमध्ये ठणठणाट
दिनेश गुळवे , बीड
जस-जसे पावसाळ्याचे दिवस पुढे सरकत आहेत, तस-तसे जिल्ह्यातील तलावातील पाणीपातळी तळ गाठू लागली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन नक्षत्र संपत आले तरी अद्यापही पाऊस पडला नाही. परिणामी बीड अंतर्गत येणाऱ्या ८० पैकी तब्बल ३५ तलावात ठणठणाट आहे. तर, २८ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड अंतर्गत ८० प्रकल्प आहेत. यात कृष्णा खोऱ्याचे मध्यम प्रकल्प ६, लघु प्रकल्प २४ तर गोदावरी खोऱ्यातील मध्यम प्रकल्प ६, व लघु प्रकल्प ४६ आहेत. यातील ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
यामध्ये सिंदफणा, सुलतानपूर, मस्सावाडी, गोलंग्री, वाणगाव, पिंपळा, खडकी, गोविंदवाडी, शिंदेवाडी, जवाहरवाडी, मादळमोही, वारणी, फुलसांगवी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
पावसाळा सुरू होऊन अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी असलेल्या धरणांमधून पाणी उपसा बंद केला आहे. तसेच, प्रकल्पात असलेले पाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांवर शेतकऱ्यांनी फळबागा, ऊस शेती केली आहे. मात्र, या धरणांमध्ये आता पाणीसाठाच नसल्याने शेतकरीही चिंताग्रस्त आहेत. प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२८ प्रकल्प जोत्याखाली
जिल्ह्यात जोत्याखाली पाणी असलेल्या प्रकल्पांची संख्या २८ तर केवळ १७ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी आहे. यावर केवळ एका धरणात पाणीसाठा आहे. ८० प्रकल्पांमध्ये मिळून उपयुक्त साठा केवळ १.७९ टक्के आहे.