पार्किंगच्या जागेत दुकाने
By Admin | Updated: August 25, 2014 01:38 IST2014-08-25T00:52:15+5:302014-08-25T01:38:33+5:30
लातूर : लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची जागा व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी देण्यात आली होती. तत्कालीन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी

पार्किंगच्या जागेत दुकाने
लातूर : लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची जागा व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी देण्यात आली होती. तत्कालीन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्यापारी संकुल बांधत असताना संबंधित कंपनीला काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. त्यानुसारच बांधकाम पूर्ण झाले. मंजूर केलेल्या आराखड्यामध्ये बेसमेंट प्लोअरमध्ये पार्किंगची जागा सोडण्यात यावी, असे सांगण्यात आल्याने तळमजला पार्किंगसाठीच सोडण्यात आला होता. मात्र तब्बल १२ वर्षांनंतर अचानकपणे पार्किंगच्या जागेतच दुकाने थाटण्यात आली आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकातील काही जागा सुनील फॉर्म इंजि. कंपनीला व्यापारी संकुल उभारण्यासाठी देण्यात आली होती. ५ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन नगर परिषदेने बांधकाम परवानगी दिली. या परवानगीनुसार गाळा क्र. जीएफ १६ ते २३ च्या खाली रिकामी जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आली होती. या पार्किंगच्या जागेवर गेल्या महिनाभरापासून हॉटेल व लॉज सुरू करण्यात आले आहे. तब्बल दहा ते बारा वर्षे रिकामी राहिलेली तळमजल्यातील पार्किंगची जागा अचानकपणे दुकाने थाटण्यात आल्याने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. पार्किंगच्या जागेचा वापर कॉम्प्लेक्समधील गाळेधारक व ग्राहकांसाठी होता. मात्र या जागेवर अतिक्रमण करून पार्किंगच हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे संकुल उभारल्यानंतर काही दिवस तळमजल्याखाली पार्किंग सुरू होती. मात्र त्यानंतर खाली वाहने नेण्यासाठी रस्ताच ठेवण्यात आला नाही. त्यामुळे ही जागा ओस पडली होती. अनाधिकृतपणे अतिक्रमण करून पार्किंगची जागा हडपण्याचा प्रकार असल्याची तक्रार संकुलातील गाळेधारकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. संभाजी बादाडे, गोविंद जाधव, सिद्धेश्वर सुरवसे, कैलास सारडे, पी.जे. पांडे, गुलाबराव बिराजदार, डॉ. गिरीश कुलकर्णी, लक्ष्मीकांत कोटलवार, सुधीर बादाडे, बाशीद शेख, विश्वनाथ भेंडे, डॉ. नविद खान, शिवराज वर्मा यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. या प्रकरणी विभागीय नियंत्रकांकडे गाळेधारकांनी तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
संकुलातील अंडरग्राऊंडमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.चे स्टोअर गाळा क्र. २१ मध्ये होते. या दुकानाला एस.टी.ने कुलूपही लावले होते. मात्र हे कुलूप तोडून त्या ठिकाणी हॉटेल व पानटपरी उभारण्यात आल्याची तक्रार गाळेधारकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. तसेच मनपाला दिलेल्या तक्रार अर्जासोबतच तत्कालीन नगर परिषदेने दिलेल्या नियम, अटी व नकाशाही जोडला आहे.
रस्त्यावरच पार्किंग..!
४बसस्थानकाच्या उजव्या बाजूला उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारक व ग्राहकांची वाहनेही अगोदरच अपुऱ्या असलेल्या रस्त्यावर पार्किंग केली जातात. परिणामी, बाजूच्या रस्त्याने स्थानकामागे जाणाऱ्या वाहनधारकांची मात्र गैरसोय वाढली आहे. अनेकदा पादचाऱ्यांना या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. पार्किंगसाठी जी जागा ठेवण्यात आली होती, ती जागा एस.टी.च्याच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळकावण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार गाळेधारकांनी केली आहे.