धर्माच्या नावावर देशभर सुरू आहे ‘दुकानदारी’
By Admin | Updated: December 13, 2014 00:29 IST2014-12-13T00:23:51+5:302014-12-13T00:29:43+5:30
औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे.

धर्माच्या नावावर देशभर सुरू आहे ‘दुकानदारी’
औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. त्यांनी धर्माला ‘व्यापार’ बनविले आहे, असा संताप व्यक्त करीत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, धर्म म्हणजे आत्मशांती आहे, लोक धर्म बदलू शकतात; पण ते आपले पूर्वज, कुळ बदलू शकत नाहीत.
विश्व हिंदू परिषद-बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू संमेलनात त्यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर स्वामी शांतीगिरीजी महाराज, भास्करगिरी महाराज, भन्ते चंद्रबोधीजी, सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, धावणी मोहल्ल्यातील गुरुद्वाराचे भाई खडकसिंग महाराज, शनिसाधिका विभाश्रीजी, संतोषमुनी कपाटे, भगवान आनंदगडकर महाराज, आनंदशास्त्रीगिरीजी महाराज, काशीगिरीजी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.
साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, जातीवाद-संप्रदायवादात हिंदू धर्माची ताकद वाटली गेली आहे. त्यामुळे धर्माची अशी दुर्दशा झाली आहे. सर्व जातिभेदाच्या भिंती तोडून एकजूट झाल्यास हिंदू धर्म प्रबल बनेल. भ्रूणहत्या व गोहत्या ही दोन मोठी पापे देशात घडत आहेत. भगवद्गीता ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ मानण्यास विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. प्रत्येकाच्या घरात गीता व गोमाता असलीच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
रामजींच्या कामात विराम नाही, असे म्हणत साध्वींनी घोषणा केली की, ‘अयोध्येत राम मंदिर उभारणार, तेही धुमधडाक्यात.’ यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. शांतीगिरी महाराजांच्या वतीने विष्णूगिरी महाराज यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात अंजनीगड येथे हनुमानाचा जन्म झाला; मात्र हे ठिकाण दुर्लक्षित आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मानवाचा धर्म मानवता आहे. मन:शुद्धीसाठी अंत:करणातील मत्सर, मोह, द्वेषाचे दहन करा, असे आवाहन भन्ते चंद्रबोधी यांनी केले.
हिंदू धर्माची संस्कृती दया आहे. तुम्ही सर्व देव बना, दैवी गुणांचे संपादन करा, असे विचार डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य यांनी मांडले. प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विनायकराव देशपांडे यांनी दिली. या संमेलनासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून
भाविक कडा आॅफिसच्या मैदानावर आले होते.