छत्रपती संभाजीनगर : प्रोझोन मॉलची कडेकोट सुरक्षा भेदून चोरांनी मध्यरात्री लाखो रुपयांची रोख, कपडे चोरून नेले. या घटनेमुळे पोलिसही हैराण झाले. यात एक संशयित ताब्यात घेण्यात आला असून एका स्टोअर व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास प्रोझोन मॉलच्या मागील बाजूने चोरांनी प्रवेश केला. तळमजल्यावरील शॉप क्र. ७२ व ७३ मध्ये असलेल्या एका चप्पल, बुटांच्या दालनात त्यांनी प्रवेश केला. तेथील काउंटर फोडून त्यातील चार लाख चार हजार रुपयांची रोकड चोरली. त्यानंतर एका सलूनमध्ये प्रवेश करत २ लाख ६१ हजार रुपये रोख रक्कम व लॅपटॉप अशी एकूण ६ लाख ६६ हजार रुपयांची रोख लंपास केली. जाताना त्यांनी एसप्रेसो या कॅफेचे काऊंटर फोडून जवळपास २० हजार रुपये रोख व मोबाइल चोरून नेला. पहाटे ३.३० च्या सुमारास एका सुरक्षारक्षकाला मॉलमध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर त्याने धाव घेतली. त्यात एक संशयित सापडला. मात्र, त्याचे अन्य साथीदार पसार झाले. एमआयडीसी सिडकोचे पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक पोलिस निरीक्षक भारत पाचोळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. स्टोअर व्यवस्थापक सुनील काटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
शटर, दरवाजे फोडून तीन तास चोरीमॉलमध्ये रात्री स्मशानशांतता असते. या शांततेतही चोरांच्या टोळीने जवळपास तब्बल तीन तास मॉलमध्ये फिरत लाखोंचा ऐवज लुटला. रोख रकमेसोबत चोरांनी जवळपास २९ हजारांचे कपडे, चप्पलदेखील चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. सापडलेल्या संशयिताच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा केला जाईल, असे निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले.
Web Summary : Thieves broke into Prozone Mall, Aurangabad, stealing ₹6.66 lakh in cash and clothes. They spent three hours inside, breaking into shops. Police arrested one suspect; others escaped. Investigation ongoing.
Web Summary : औरंगाबाद के प्रोझोन मॉल में चोरों ने सेंध लगाकर 6.66 लाख रुपये नकद और कपड़े चुरा लिए। उन्होंने दुकानों में तोड़फोड़ की। पुलिस ने एक संदिग्ध को गिरफ्तार किया; अन्य फरार। जांच जारी है।