वाळूज महानगर : वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इतिहास विषयाचे शिक्षक शहा यांनी होमवर्क न केल्याच्या कारणावरून मंगळवारी छडीने अमानुष मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, लाइननगर, वाळूज येथील मिलिंद पांडुरंग कांबळे यांचा मुलगा ऋतुराज (वय १३) हा सातवीत शिक्षण घेत आहे. दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी त्याची आई रेखा कांबळे यांनी त्याला शाळेत सोडले होते. शाळा सुटून घरी परतल्यावर ऋतुराजने पालकांना सांगितले की, इतिहासाचे शिक्षक शहा यांनी काल दिलेले होमवर्क पूर्ण न केल्यामुळे त्याला लाकडी छडीने पृष्ठभाग, डावी मांडी व डाव्या दंडावर मारहाण केली, तसेच हात पकडून पायावर पाय ठेवले. विद्यार्थ्याच्या शरीरावर वळ उमटलेले पाहून वडिलांनी त्याला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविले असून, संबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.