स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:14 IST2025-06-05T08:13:27+5:302025-06-05T08:14:06+5:30
१५ ते २० लाख रुपये घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा उद्योग सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला

स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : मुंबईत ‘डीएमईआर’ कार्यालयाशेजारच्या रुग्णालयाच्या इमारतीत पैसे घेऊन नियुक्ती देणाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. हे ६ लाख रुपये देऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराने ‘लोकमत’शी बोलताना दिली. अपात्र उमेदवारांकडून १५ ते २० लाख रुपये घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा उद्योग सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. स्टाफ नर्सची परीक्षा दिलेल्या उमेदवाराने ‘लोकमत’शी संपर्क साधत कशा प्रकारे पैसे घेतले जात आहेत, हे सांगितले.
मी ‘लोकमत’ची बातमी वाचली. मी पण २०१८ मध्ये वैद्यकीय शिक्षण या विभागात स्टाफ नर्स या पदासाठी परीक्षा दिली होती. परीक्षा काळात धुळे येथील दोन ब्रदरशी संपर्क आला. त्यांनी मला स्टाफ नर्स या पदावर थेट नियुक्ती करून देऊ, यासाठी १० लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे मी वेळोवेळी ६ लाख रुपये त्यांना दिले. नियुक्तीपत्रासाठी तगादा सुरू केला असता त्यांनी २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत तुमचे काम झाले, असे सांगून २९ एप्रिल २०२४ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले नसतानाही ‘डीएमईआर’ कार्यालयाशेजारील रुग्णालयाच्या इमारतीत कागदपत्र पडताळणी करून प्राधान्य क्रमांक भरून घेतला. परंतु आजपर्यंत नियुक्ती पत्र मिळाले नाही.
पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्नही केला. पण पैसे देणे हासुद्धा गुन्हा आहे. पोलिस परत आपल्यावरच कारवाई करायचे, त्यामुळे गप्प बसलो.