धक्कादायक ! बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड वापरून महिलेने उचलले महामंडळाकडून कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:49 PM2021-02-19T17:49:49+5:302021-02-19T17:53:19+5:30
बनावट निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला तयार करून वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केली.
औरंगाबाद : पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेने बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड आदी कागदपत्रे तयार करून वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज उचलले व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार क्रांती चौक ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणात मुख्य मोहरा हा विमा व्यवसायात शेकडो लोकांना गंडविणारा विष्णू भागवत असून त्याच्यासह तिघाजणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सहायक निरीक्षक शांतीलाल राठोड यांनी सांगितले की, महावितरणच्या हर्सूल येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत रामदास धोंडिराम डोंगरे व त्यांची पत्नी रेखा रामदास डोंगरे यांचा कौटुंबीक न्यायालयात वाद सुरू आहे. रामदास व रेखाचा विवाह सन २००० मध्ये औरंगाबादेत झाला. त्यांना एक मुलगा आहे. नोकरीनिमित्त हे दाम्पत्य लातूर, नाशिक येथे सोबत राहिले. सन २००९ मध्ये रामदासने कर्ज काढून नाशिक येथे रो-हाऊस खरेदी केले व ते तेथे राहू लागले. सन २०१०-११ मध्ये रेखाने औरंगाबादेत ब्युटिशियनचा कोर्स केला. दरम्यानच्या काळात तिची व विष्णू भागवतसोबत ओळख झाली. तिने इंडस् हेल्थ प्लसची डिस्ट्रीब्युटरशीप घेतली. त्यात विष्णू भागवतलाही रूजू करून घेतले. या कामात रेखाची विवाहित बहीण मदत करत होती.
रामदास डोंगरे यांच्या गैरहजेरीत त्याची पत्नी व विष्णू भागवत व्यावसायिक मिटिंगचे कारण सांगून औरंगाबादेत अनेकदा मुक्कामला राहिले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या काळात तिने स्वत:च्या रेखा रामदास राठोड अशा नावाचे बनावट निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला तयार केला. त्याद्वारे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केली. या कामामध्ये तिची औरंगाबादेत राहत असलेली तिची बहीण व विष्णू भागवत यांनी मदत केली आहे. दरम्यान, सहायक निरीक्षक राठोड यांनी सांगितले की, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून यांनी नेमके किती कर्ज उचलले, हे पुढील तपासात समोर येईल.