धक्कादायक! गुणवत्ताधारकांना वंचित ठेवून बोगस अनुभव प्रमाणपत्रावर चौघे बनले आरोग्यसेवक

By संतोष हिरेमठ | Updated: August 19, 2025 16:30 IST2025-08-19T16:21:27+5:302025-08-19T16:30:02+5:30

सरकारी नोकरीसाठी बोगस अनुभव प्रमाणपत्र; जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पदाच्या भरतीतील गैरप्रकार

Shocking! Four people became healthcare workers on bogus experience certificates, depriving qualified people | धक्कादायक! गुणवत्ताधारकांना वंचित ठेवून बोगस अनुभव प्रमाणपत्रावर चौघे बनले आरोग्यसेवक

धक्कादायक! गुणवत्ताधारकांना वंचित ठेवून बोगस अनुभव प्रमाणपत्रावर चौघे बनले आरोग्यसेवक

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी (५० टक्के) पदाच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या काही उमेदवारांनी चक्क बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी, गुणवत्ताधारक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत असल्याची ओरड होत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी (५० टक्के) या पदाच्या ५७ रिक्त जागांसाठी २०२३ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेत हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्यांना प्राधान्यक्रम होते. त्यानुसार १२ उमेदवारांनी राज्यातील विविध जिल्हा हिवताप कार्यालयात हंगामी कर्मचारी म्हणून काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे त्यांची निवड झाली. यासंदर्भात ९ मे रोजी अंतरिम निवड व प्रतीक्षा यादी लागली. मात्र, यातील काही उमेदवारांनी बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याचा आक्षेप काहींनी घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यांच्याकडून अभिप्राय मागविला. त्यातून काही बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केल्यावर शिक्कामोर्तब झाले. ४ जणांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही संख्या वाढू शकते, असे प्रतीक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांनी सांगितले.

निवड रद्द केली जाईल
चार जणांनी अवैध दाखले सादर केले असून, त्यांची निवड रद्द केली जाईल. त्यांच्या जागा ओपनला दिल्या जातील. या पदभरती प्रक्रियेसंदर्भात बैठक घेऊन प्रक्रिया होईल आणि अंतिम यादी जाहीर केली जाईल.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

अंतिम यादी लावावी
माझ्या मावस भावाने परीक्षा दिलेली असून, गुणवत्ता यादीत त्याचे नाव आहे. जिल्हा परिषदेने लवकरात लवकर अंतिम यादी लावली पाहिजे.
- संतोष वाघमारे, उमेदवाराचे नातेवाईक

Web Title: Shocking! Four people became healthcare workers on bogus experience certificates, depriving qualified people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.