धक्कादायक ! सुरक्षेशिवाय कोरोनाबाधित विधार्थ्याने इतरांसोबत दिला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 14:02 IST2021-04-08T13:49:20+5:302021-04-08T14:02:20+5:30
exam paper given by a corona positive student with others सदर विद्यार्थी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तेथे आले असता त्याने त्यांच्याकडे परीक्षा देण्यासाठी परवानगी मागितली.

धक्कादायक ! सुरक्षेशिवाय कोरोनाबाधित विधार्थ्याने इतरांसोबत दिला पेपर
पैठण (जि. औरंगाबाद) : परीक्षा देत असलेला एक विद्यार्थी कोरोनाबाधित असून, तो थेट कोविड सेंटरमधून आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठान महाविद्यालयात मिळताच परीक्षा केंद्रात मोठा गोंधळ उडाला. अन्य विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. अखेर पोलिसांनी येऊन कोरोनाबाधित विद्यार्थ्याचा शोध घेतला तेव्हा हा विद्यार्थी साधा मास्क घालून अन्य विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देत असल्याची गंभीर बाब समोर आली. यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.
पदवी परीक्षेचा बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. प्रतिष्ठान महाविद्यालयात १४५५ विद्यार्थी हजर होते. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास होत नाही तोच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेला विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती महाविद्यालयाचे मुख्य लिपिक इम्रान पठाण यांना मिळाली. महाविद्यालय प्रशासनाने त्या विद्यार्थ्याचा शोध सुरू केला. ही वार्ता वाऱ्यासारखी परीक्षा केंद्रात पसरल्याने गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटूसिंग गिरासे यांनी कोविड सेंटरशी संपर्क साधून सदर रुग्णाचे नाव घेतले. शोध घेतल्यावर सदर रुग्ण शांतपणे परीक्षा देताना सापडला. लगेच त्याला तेथून उठवून वेगळी व्यवस्था केली गेली.
कोविड सेंटरचा गलथान कारभार
सदर विद्यार्थी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तेथे आले असता त्याने त्यांच्याकडे परीक्षा देण्यासाठी परवानगी मागितली. आवश्यक उपाययोजनांसह पीपीई किट घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड सेंटरप्रमुखांना दिल्या होत्या, असे बाधित विद्यार्थ्याने महाविद्यालयात सांगितले; परंतु प्रत्यक्षात तो परीक्षेला आल्यानंतर साध्या मास्कवरच होता.
आम्हाला माहिती दिली नाही...
या विद्यार्थ्याबाबत कोविड सेंटरने आम्हाला पूर्वकल्पना द्यायला हवी होती. नाही तर त्याची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असती. बाधित दोन जण ऑनलाइन परीक्षा देत आहेत, असे मुख्य लिपिक इम्रान पठाण यांनी सांगितले.
पेपर अर्धवट सोडून निघून आलो...
सदर विद्यार्थी वर्गात जोरजोरात खोकलत होता. तो बाधित असल्याचे समजताच आम्ही पेपर अर्धवट सोडून आलो. वर्गात भीतीचे वातावरण पसरले, असे अन्य विद्यार्थ्यांनी सांगितले.