धक्कादायक ! तपासादरम्यान आरोपीचा 'मर्डर वेपन'द्वारे पोलिसांवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:31 IST2020-04-21T19:18:41+5:302020-04-21T19:31:01+5:30
जीवाची पर्वा न करता विशेष धाडस दाखविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतूक करण्यात येत आहे.

धक्कादायक ! तपासादरम्यान आरोपीचा 'मर्डर वेपन'द्वारे पोलिसांवर प्राणघातक हल्ला
पैठण : सख्खा भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन करणाऱ्या आरोपीने राहता ता. राहता जि अहमदनगर येथे लपवलेली कुऱ्हाड काढून देत असताना अचानक पोलीसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदार जखमी झाले असून केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून दोघे बचावले. जखमी झालेले असतानाही पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, मधुकर मोरे व रामकृष्ण सागडे यांनी झडप घालून ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी विरोधात राहता जि अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवाची पर्वा न करता विशेष धाडस दाखविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतूक करण्यात येत आहे.
पैठण शहरातील एका शाळेत स्कूल बस चालवणारा चालक शिवाजी लोखंडे याचा खुन झाल्याचे रविवारी उघडकीस आले होते. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख व भागवत फुंदे यांनी २४ तासाच्या आत या खुनाचा तपास लावत मयत शिवाजी लोखंडे याचा सख्खा मोठा भाऊ गोरख लोखंडे रा. राहता यास अटक केली होती. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने लहानभाऊ शिवाजी लोखंडे याचा खुन केल्याची कबुली आरोपी गोरख लोखंडे याने पोलीसांना दिली होती.
आरोपी गोरख लोखंडेने खुन करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यासाठी सोमवारी पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, रामकृष्ण सागडे यांच्यासह सहाय्यक फौजदार मधुकर मोरे पंचासह आरोपीस घेऊन त्याच्या राहता जि अहमदनगर येथील घरी गेले. राहता येथील चारी क्रमांक १५ वर आरोपीचे घर असून या ठिकाणी गेल्यावर आरोपीने कुऱ्हाड लपवून ठेवल्याच्या विविध जागा दाखवल्या, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे त्याने दाखवलेल्या जागेवर कुऱ्हाडीचा शोध घेत होते, सहाय्यक फौजदार मधुकर मोरे आरोपीसह वाहनात बसून होते, तर पोलीस उपनिरीक्षक संतोष माने पंचनामा रिपोर्ट साठी व्हिडीओ चित्रिकरण करण होते. परंतु, आरोपी गोरख लोखंडेने दाखविलेल्या जागेवर कुऱ्हाड मिळून येत नव्हती शेवटी गोरखने मी शोधून देतो असे सांगितल्याने सहाय्यक फौजदार मधुकर मोरे त्याला त्याच्या घराच्या बाजुला असलेल्या शेडमध्ये घेऊन आले.
एव्हाना रात्रीचे साडेसात वाजल्याने अंधार झाला होता. शेडमध्ये बँटरीच्या प्रकाश झोतात कुऱ्हाडीचा शोध सुरू असताना अचानक गोरख लोखंडे याने एका प्लायवूड खालून कुऱ्हाड काढून पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांच्यावर वार केला माने यांनी हाताने कसाबसा वार चुकवला परंतु तो वार त्यांच्या करंगळीवर बसला, मधुकर मोरे, रामकृष्ण सागडे आरोपीवर झडप घालणार तोच आरोपी गोरख लोखंडेने मधुकर मोरे यांच्या डोक्यावर वार केला मात्र मोरे खाली वाकल्याने तो वार त्यांच्या पाठीत बसला. दरम्यान, फौजदार सागडे, व माने यांच्या मदतीने मधुकर मोरे यांनी आरोपीस मीठी मारून खाली पाडले, सागडे यांनी आरोपीच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली.
या हल्ल्यात फौजदार संतोष माने, सहाय्यक फौजदार मधुकर मोरे कुऱ्हाडीच्या घावाने जखमी झाले आहेत. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात फौजदार संतोष माने व मधुकर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोरख लोखंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.