धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 19:32 IST2021-09-15T19:24:37+5:302021-09-15T19:32:36+5:30
घाटी रुग्णालयात नाॅनकोविडसह कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी चिठ्ठ्या देणे सुरूच

धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात नाॅनकोविडसह कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी चिठ्ठ्या लिहून देणे सुरूच आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी औषधाची चिठ्ठी घेऊन घाटी परिसरातील दुकानांवर गेल्यानंतर २४ औषधी गोळ्यांसाठी तब्बल २० हजार रुपये आकारण्यात येतात. त्याच गोळ्या दिवसा अवघ्या ४०० रुपयांत मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
घाटी रुग्णालयाला गेल्या दोन महिन्यांपासून औषधांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हाफकिनकडून औषधींचा अत्यल्प पुरवठा होत आहे. गतआठवड्यात घाटी रुग्णालयाला हाफकिनकडून दीड ते दोन महिने पुरेल इतका औषधसाठा प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधी घेऊन येण्यास सांगणे काही बंद झालेले नाही. ११ सप्टेंबर रोजी एका रुग्णाला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्ण दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत डाॅक्टरांनी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची चिठ्ठी नातेवाइकांकडे दिली. एकूण २४ औषधी गोळ्यांची ती चिठ्ठी होती. ही चिठ्ठी घेऊन नातेवाईक रात्री घाटी परिसरातील औषधी दुकानावर गेले; परंतु दोन ते तीन दुकाने फिरल्यानंतरही ती औषधी मिळत नव्हती. अखेर एका औषधी दुकानात औषधी मिळतील, असे सांगण्यात आले. या औषधींची किमत ऐकून नातेवाइकांच्या पायाखालची वाळूच सरकली. या औषधींसाठी तब्बल २० हजार रुपये लागतील, असे दुकानदाराने सांगितले. सोबत एवढी रक्कम नसल्याने नातेवाईक माघारी परतले. दुसऱ्या दिवशी तीच औषधी अन्य मेडिकलमध्ये अवघ्या ४०० रुपयांत मिळाली.
सकाळी स्वस्तात मिळाली
घाटी परिसरातील मेडिकल स्टोअरमध्ये रात्री औषधी गोळ्यांसाठी २० हजार रुपये सांगितले. एवढी मोठी रक्कम जवळ नसल्याने परत गेलो; परंतु तीच औषधी सकाळी फक्त ४०० रुपयांत मिळाली. घाटी रुग्णालयातूनच रुग्णांना औषधी मिळाली पाहिजे.
- संजय जगदाळे
चौकशी केली जाईल
सध्या कोविड आणि नाॅनकोविडची औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. औषधी चिठ्ठी का लिहून देण्यात आली, याची चौकशी केली जाईल.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
हेही वाचा - जावयाचा प्रताप ! सासऱ्याकडून १० लाख उकळून पत्नीला दिले बनावट नियुक्तीपत्र