अपात्रतेच्या धक्क्याने इच्छुकांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:11+5:302020-12-30T04:06:11+5:30
कन्नड : निवडणूक लढविली मात्र निवडणूक खर्च सादर न केल्याने तालुक्यातील ५५२ जणांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याने खळबळ उडाली ...

अपात्रतेच्या धक्क्याने इच्छुकांचे धाबे दणाणले
कन्नड : निवडणूक लढविली मात्र निवडणूक खर्च सादर न केल्याने तालुक्यातील ५५२ जणांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याने खळबळ उडाली आहे. तालुका निवडणूक विभागाने डकविलेल्या अपात्र जणांच्या यादीत काही गावांतील पॅनलप्रमुख तर काही इच्छुक उमेदवारांचा समावेश असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. या अपात्र उमेदवारांना यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
तालुक्यात २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत दैनंदिन हिशोब निवडणूक विभागास सादर करणे आवश्यक होते. विहित कालावधीत खर्च सादर न करणाऱ्यांना निवडून आलेल्या व पराभूत १ हजार २९९ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७४७ उमेदवारांनी दिलेली उत्तरे मान्य करण्यात आली, तर ५५२ जणांची उत्तरे मान्य झाली नाही. ज्यांची उत्तरे अमान्य झाली त्यांची यादी निवडणूक विभागाने दर्शनी भागात डकविली आहे. या नावात काही गावातील पॅनलप्रमुखांसह निवडणूक लढविण्याची तयारी केलेल्या इच्छुकांचा समावेश आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अखेरचे दोनच दिवस शिल्लक असल्याने अपात्र ठरलेल्या इच्छुक उमेदवाराच्या ऐवजी नव्याने उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.