शिवसेनेला अध्यक्षपद देण्याची खेळी
By Admin | Updated: September 20, 2014 00:06 IST2014-09-19T23:56:19+5:302014-09-20T00:06:30+5:30
परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले

शिवसेनेला अध्यक्षपद देण्याची खेळी
परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने दुसऱ्या गटाकडून अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नाव पुढे करण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा होत आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ सदस्य असून १८ सदस्य अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्याकडे असल्याचे समजते. उर्वरित सात सदस्य सुरेश वरपूडकर यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी लागणारे संख्याबळ गाठण्यासाठी विटेकर यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. तर विटेकर यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने वेगळी चाल चलली असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेला देऊन उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडे ठेवावे, असा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. असे असले तरी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटासोबत जाण्यास शिवसेनेतील एक गट तयार नाही. त्यामुळे राकाँच्या दुसऱ्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. जि. प. मध्ये शिवसेनेचे ११ सदस्य असून एक सदस्य अमेरिकेत गेले आहेत. काँग्रेसचे आठ पैकी ३ सदस्य यापूर्वीच विटेकर यांच्या गटासोबत सहलीवर गेले आहेत.