पालिकेच्या कारभाराविरुद्ध शिवसेनेचे उपोषण
By Admin | Updated: August 25, 2016 01:00 IST2016-08-25T00:49:22+5:302016-08-25T01:00:21+5:30
उस्मानाबाद : शहरातील प्रभाग १ मध्ये विकास कामे राबविण्याची मागणी करूनही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्या या दुर्लक्षित कारभाराविरूद्ध शिवसेनेच्या नगरसेविका

पालिकेच्या कारभाराविरुद्ध शिवसेनेचे उपोषण
उस्मानाबाद : शहरातील प्रभाग १ मध्ये विकास कामे राबविण्याची मागणी करूनही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्या या दुर्लक्षित कारभाराविरूद्ध शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा पाटील यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधारी मंडळीकडून विरोधी म्हणजेच सेनेचे वर्चस्व असणाऱ्या प्रभागांच्या विकासाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप नगरसेविका पाटील यांनी केला. याच प्रभागातील शाहुनगर भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असतानाही सत्ताधाऱ्यांकडून हे केेंद्र इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भागातील सुमारे ६५ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, हे आरोग्य केंद्र शाहुनगरमध्येच व्हावे, अशी मागणीही पाटील यांनी केली. दरम्यान, या प्रभागात रस्ते आणि नाल्यांचा प्रश्नही गंभीर आहे. पालिकेकडे अनेकवेळा पाठपुरवा केला. परंतु, सत्ताधारी मंडळीकडून कानाडोळा केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला. शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे साफसफाईच्या टेंडरची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज साळुंके, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हासंघटक श्रीकांत देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हासंघटक मुजीब पठाण, वाहतुक सेनेचे जिल्हा संघटक बालाजी पवार, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, जि. प. सदस्या सुषमा देशमुख आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)