प्रभाग रचनेच्या विरोधात शिवसेना
By Admin | Updated: June 8, 2014 01:13 IST2014-06-08T01:01:00+5:302014-06-08T01:13:59+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे.

प्रभाग रचनेच्या विरोधात शिवसेना
औरंगाबाद : महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे. जुन्या वॉर्डनिहाय पद्धतीनेच रचना करून मतदान घ्यावे, यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले. प्रभागनिहाय निवडणुका घेणे हे बंधनकारक आहे की, नाही हे तपासून युती याबाबत निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
एका वॉर्डात एकच नगरसेवक असला पाहिजे. प्रभागामुळे एकच मतदार दोन वेळा मतदान करील हे घटनेत बसत नाही. तसेच एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यास त्याचा परिणाम विकासकामांवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रभाग पद्धतीला शिवसेना विरोध करणार आहे. मुंबईला वॉर्ड पद्धत आहे. त्याप्रमाणे येथेही वॉर्ड पद्धत ठेवण्यासाठी पक्षाची मागणी आहे. पालिका प्रशासन सध्या विद्यमान वॉर्डांचे नकाशे तयार करीत आहे. ते काम झाल्यावर प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेण्यासाठी तयार करणार असल्याचे खा.खैरे म्हणाले. १२० वॉर्ड होतील असा २०११ च्या जनगणेनुसार अंदाज आहे. त्यानुसार ओपन, ओबीसी, महिला, एस.सी., एस. टी. अशी आरक्षणाची सोडत होईल. ही सोडत जुन्या पद्धतीनेच झाली पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह राहील. त्यासाठी केंद्र, राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येईल.
मनपा प्रशासनाचे काम अंतिम टप्प्यात
महापालिकेची एप्रिल-२०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या नकाशांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ११४ वॉर्ड, ५७ प्रभाग होतील, असा मनपाचा अंदाज आहे. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली असून, पुढच्या आठवड्यात नकाशांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे जाईल.
नकाशांचे काम संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आयोगाच्या सूचनेनुसार पुढील काम केले जाणार आहे. जनगणनेच्या आधारे जसे लोकसंख्येचे ब्लॉक आहेत, त्या आधारावर प्रभागांची रचना राहणार नाही. आयोगाने लोकसंख्येचे जे निकष दिले आहेत, त्यावर प्रभागांची रचना असेल.
विद्यमान हद्दींचा फक्त आधार घेतला जाणार आहे. काही प्रभागांमध्ये वाढलेली लोकसंख्या तशी राहू शकते. त्यामुळे प्रभागांची संख्या विषम प्रमाणातही असू शकेल. औरंगाबाद आणि कोल्हापूर या दोनच मनपांमध्ये सध्या वॉर्डनिहाय मतदान पद्धती आहे.