शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
By बापू सोळुंके | Updated: November 2, 2025 17:44 IST2025-11-02T17:44:21+5:302025-11-02T17:44:38+5:30
'राज्यात महायुतीचे सरकार हे दगाबाज आहे. यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. '

शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
छत्रपती संभाजीनगर: शिंदेसेनेचे नेते तथा मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत स्वतंत्र लढण्याविषयी भाष्य केले. मात्र त्यांच्या भाष्याला काहीच किंमत नाही, कारण शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे आहेत. यामुळेच त्यांच्या नेत्यांना वारंवार दिल्लीला जावे लागते, अशी खरमरीत टीका माजी विरोधीपक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आज (दि. ९) येथे पत्रकार परिषदेत केली.
दानवे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार हे दगाबाज आहे. यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. निवडणूक आयोगावरील टीकेला भाजपवाले उत्तर देतात. अशा परिस्थितीत महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे एक नेते आगामी निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याच्या विधानाला काहीच अर्थ नाही. शिंदेसेना भाजपच्या मर्जीवरच चालणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्लीला जावे लागते, अशी टीका दानवे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना केली.
छत्रपती संभाजीनगर शहरात खूनाचे सत्र थांबत नसल्याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपल्या शहरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावरील सुसाईड नोटनूसार त्यांची आत्महत्या असल्याची नोंद झाली आहे. मात्र हा खूनच असल्याचा आरोप दानवे यांनी केला. या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली ही चांगली बाब आहे. मात्र एसआयटीमध्ये निष्पक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी,अशी आमची मागणी आहे. ८ नोव्हेंबर नंतर फलटण येथे डॉ. संपदा मुंडे प्रकरणात आम्ही मोर्चा काढणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.