शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल रिंग रोड करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:55 IST2025-04-28T15:52:10+5:302025-04-28T15:55:02+5:30
शेंद्रा डीएमआयसीमध्ये एक्झिबिशन-कम-कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी अनुभवी संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी उद्योजकांना केली.

शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल रिंग रोड करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गानंतर संभाजीनगर-पुणे या ग्रीन फिल्ड रोडला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. आता समृद्धी महामार्गाला वाढवण पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा ॲक्सेस कंट्रोल रोड तयार करत आहोत, यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील कंटेनर अवघ्या सात ते आठ तासांत वाढवण पोर्टवर पोहोचेल. ऑरिक सिटीच्या शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी कनेक्टिव्हिटी करण्याचा निर्णय २०१८ मध्येच घेतला होता. मात्र, काही कारणांमुळे हा रोड झाला नसल्याचे समजले. मात्र, आता हा इंडस्ट्रीयल रिंग रोड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए)चा पहिला औद्योगिक पुरस्कार वितरण समारंभ एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉल येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अतुल सावे, इंड्युरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन, नाथ सीड्सचे नंदकुमार कागलीवाल, डॉ. नरेंद्र मैरपाडी, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे, उपाध्यक्ष उत्सव माछर, अथर्वेशराज नंदावत यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील अनेक राज्यांत डीएमआयसी कॉरिडोअर गेला आहे. मात्र, पहिली स्मार्ट सिटी केवळ आपणच छत्रपती संभाजीनगरमध्ये करू शकलो. येथे अस्तित्वात असलेल्या इको सिस्टीम नेटवर्क, ऑटो क्लस्टरमुळे हे शक्य झाले. टोयटा, जेएसडब्ल्यू, अथरमुळे छत्रपती संभाजीनगर ईव्ही कॅपिटल बनले आहे. यापुढे जमिनीची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेऊन ८ हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल रिंग रोड लवकरच करू, अशी घोषणाही त्यांनी केली. शेंद्रा डीएमआयसीमध्ये एक्झिबिशन-कम-कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी अनुभवी संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी उद्योजकांना केली. सीएमआयएला कौशल्य विकास केंद्रासाठी ५ एकर जमीन देण्याची घोषणा त्यांनी केली. शेंद्रा-वाळूज फ्लाय ओव्हर पुढच्या काळात करू, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात अर्पित सावे यांनी डीएमआयसीमध्ये उद्योगांनी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल. उद्योजक अनुराग जैन आणि राम भोगले यांनी मनोगत व्यक्त केले.
केंद्राकडे पाठपुरावा
खा. डाॅ. भागवत कराड यांनी पाठपुरावा करून जायकवाडी धरणात तरंगता सोलार ऊर्जा प्रकल्प आणला आहे. या प्रकल्पासाठी तसेच औट्रम घाट बोगदाकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.